पिंपरी : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परवानाधारक पिस्तूल जवळ बाळगून फिरण्यास, सार्वजनिक ठिकाणी ते नेण्यास जिल्हा प्रशासनाने मनाई केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील ११२२ परवानाधारकांनी आतापर्यंत आपल्याकडील पिस्तूल पोलिसांकडे जमा केली आहेत. जमा केलेली पिस्तुले निवडणूक निकाल लागल्यानंतर म्हणजेच २३ नोव्हेंबरनंतर सात दिवसांनी परत केली जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान आहे. ही निवडणूक प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी निवडणूक विभागाबरोबरच जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनानेही कंबर कसली आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत पिंपरी, चिंचवड, भोसरी, खेड, मावळ, भोर-वेल्हा-मुळशी, वडगावशेरी, खडकवासला या विधानसभा मतदारसंघांचा भाग समाविष्ट होतो. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे आवश्यक असल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता कलम प्राप्त अधिकारान्वये निवडणूक कालावधीत परवानाधारक पिस्तूल जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. निवडणूक काळात शस्त्र बाळगणे तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असे कृत्य करण्यास मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> पुणे: ऐन दिवाळीत गोळीबाराची अफवा, अल्पवयीनाकडून नियंत्रण कक्षाला दूरध्वनी

आर्थिक व वैयक्तिक सुरक्षेच्या कारणास्तव, ग्रामीण भागात शेतातील पिकांचे संरक्षण, रानटी जनावरांपासून संरक्षण मिळविण्यासाठी पिस्तूल, रिव्हॉल्वर आणि दुबार बंदुकीचे परवाने जिल्हाधिकाऱ्यांकडून दिले जातात. गृह विभागाने लागू केलेल्या सर्व अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून शस्त्र परवाना दिला जातो. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत एकूण १८०० पिस्तूल परवानाधारक आहेत. त्यापैकी ११२२ जणांनी आपली पिस्तुले पोलिसांकडे जमा केली आहेत. संबंधित पोलीस ठाण्याने पिस्तूल परवानाधारकाला पिस्तूल जमा करण्याबाबत नोटीस बजावल्यास सात दिवसांच्या आत पिस्तूल जमा करणे बंधनकारक असते. शहरासह ग्रामीण भागात गुन्हेगारीचे प्रमाण मोठे आहे. आतापर्यंत अनेक गुन्ह्यांत गावठी कट्टे, पिस्तूल अशा शस्त्रांचा वापर झाला आहे. निवडणूक काळात या गुन्ह्यांचे प्रमाण आणखी वाढते. याच पार्श्वभूमीवर ही शस्त्रे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> गिग कामगारांचा उद्या संप! स्विगी, झोमॅटोसह इतर ऑनलाइन डिलिव्हरी सेवा ठप्प होणार

ज्या परवानाधारकावर गंभीर गुन्हा दाखल आहे, गंभीर गुन्ह्यातून ज्यांची नुकतीच जामिनावर सुटका झालेली आहे किंवा ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा व्यक्तींना संबंधित पोलीस ठाण्यात पिस्तूल जमा करावी लागणार आहेत. उर्वरित पिस्तूलधारकांना निवडणूक काळात पिस्तूल जवळ बाळगण्यास, सार्वजनिक ठिकाणी पिस्तूल नेण्यास प्रशासनाने मनाई केलेली आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर सात दिवसांनंतर ही पिस्तुले परत केली जाणार आहेत.

 ‘तरच पिस्तूल बाळगता येणार’

निवडणूक काळात सरसकट सर्वांचेच पिस्तूल जमा करून घेता येणार नाहीत, असे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. एखाद्या राजकीय व्यक्तीला खरोखरच पिस्तूल जवळ बाळगणे गरजेचे असेल, तर तसा अर्ज त्याने देणे आवश्यक असते. त्यानंतर संबंधित समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राजकीय व्यक्तीला पिस्तूल बाळगण्याची परवानगी द्यायची किंवा नाही याबाबत निर्णय घेतला जातो. आयुक्तालयाच्या हद्दीत १८०० परवानाधारक पिस्तूल आहेत. यापैकी ३६६ जणांना सवलत देण्यात आली आहे. इतरांना पिस्तूल जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार, आतापर्यंत ११२२ जणांनी पिस्तूल जमा केले आहेत. उर्वरित व्यक्तींकडून पिस्तूल जमा करून घेतले जात आहेत, असे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील विशेष शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1122 people deposited license pistols with police in pimpri ahead of assembly polls in maharashtra pune print news ggy 03 zws