पुणे : पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर, नाशिक, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत आता दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल.

हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच क्लिकवर!

माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत तीन नियमित फेऱ्या, तर एक विशेष फेरी अशा एकूण चार फेऱ्या राबवण्यात आल्या. मात्र अद्यापही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याने, तसेच राज्य मंडळाने घेतलेल्या पुरवणी परीक्षेच्या निकालातील उत्तीर्ण आणि एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी मिळण्यासाठी दुसरी विशेष फेरी राबवली जाणार आहे. त्यासाठी या फेरीचे वेळापत्रक गुरुवारी जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना ९ ते ११ सप्टेंबर दरम्यान अर्ज भरण्यासह अर्जात दुरुस्ती, पसंतीक्रम नोंदवणे, अर्जाचा भाग दोन भरणे आदी प्रक्रिया करता येणार असून, दुसऱ्या फेरीची निवड यादी १५ सप्टेंबरला जाहीर होईल. तर १५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत प्रवेश निश्चित करणे, प्रवेश रद्द करणे आदी प्रक्रिया होईल. विशेष फेरीमध्ये दहावी उत्तीर्ण सर्व विद्यार्थी, एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. या पूर्वी अर्ज भरलेले आणि प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही सहभागी होता येईल. विशेष फेरीत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याने नव्याने संमती देणे आवश्यक असल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या प्रवेश अर्जाचा भाग दोन अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पसंतीक्रम सुधारित करून अर्ज पुन्हा लॉक करणे गरजेचे आहे. एटीकेटी सवलत प्राप्त विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाठी अर्ज भरताना दहावीच्या गुणपत्रिकेतील सहा विषयांचे गुण भरावेत. गुणपत्रके एकापेक्षा जास्त असल्यास सर्वांत शेवटच्या परीक्षेचा बैठक क्रमांक अर्जात नोंदवून सर्व गुणपत्रके अपलोड करावीत. उत्तीर्ण सर्व विषयांची एकूण नोंदवावी. एटीकेटी असल्यास उर्वरित एक किंवा दोन विषयांचे सर्वोत्तम गुण मोजून सहाशेपैकी गुण नोंदवावेत. सदर गुण पाचेशपैकी गुणांमध्ये रुपांतरित करून गुणवत्ता यादीसाठी ग्राह्य धरले जातील. एटीकेटी असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने प्रवेश अर्ज भरून भाग एक आणि भाग दोन पुन्हा लॉक करणे आवश्यक आहे. भाग एक या पूर्वी भरला असल्यास त्यातील माहिती आवश्यकतेनुसार सुधारित करून अर्ज लॉक करावा. पूर्वी अनुत्तीर्ण असलेल्या आणि जुलै २०२२च्या पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी रिपीटर म्हणून अर्ज भरावा.

आरक्षित जागांवर त्या प्रवर्गाचे विद्यार्थी न मिळाल्यास खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश

विशेष फेरीमध्ये आरक्षित प्रवर्गाच्या जागा विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास खुला प्रवर्गासाठी दिल्या जातात. त्यामुळे संबंधित प्रवर्गात त्यात विद्यालयाची मागणी केलेल्या विद्यार्थ्याच्या उपलब्धतेबाबत तपासणी करून त्या विद्यार्थ्यांना प्रथम संधी दिली जाईल आणि त्या प्रवर्गातील उमेदवार संपल्यानंतर जागा रिक्त जागा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना दिल्या जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे.