पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या फेरीची निवड यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. पहिल्या फेरीत ४२ हजार २३९ विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, २३ हजार ३५१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झाले.
दहावीचा निकाल लागल्यानंतर ८ जूनपासून अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यानुसार अर्जाचा पहिला भाग भरण्यासाठी १२ जूनची तर दुसरा भाग भरण्यासाठी १५ जूनची मुदत देण्यात आली होती. परंतु दिलेल्या मुदतीत अनेक विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा पहिला भाग भरता आला नाही. त्यामुळे पहिला भाग भरण्यासाठी १४ जून, तर दुसरा भाग भरण्यासाठी १७ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.

पहिल्या फेरीच्या निवड यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे २ हजार ४७६, वाणिज्य शाखेचे ८ हजार ५००, विज्ञान शाखेचे ११ हजार ९५३, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ४२२ विद्यार्थी आहेत. प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना २४ जूनपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे.

Story img Loader