लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: अकरावी प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी उद्या (३ जुलै) सकाळी दहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे. दुसऱ्या फेरीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत महाविद्यालयांमध्ये जाऊन प्रवेश प्रवेश निश्चित करता येणार असून, दुसऱ्या फेरीत पात्रता गुण वाढणार की कमी होणार असा प्रश्न आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशाठी ३२४ महाविद्यालयांत एकूण १ लाख १४ हजार ३५० जागा उपलब्ध आहेत. त्यात ८९ हजार ३९४ जागा केंद्रीभूत प्रवेशांसाठी, तर २४ हजार ९५६ कोटा प्रवेशांसाठीच्या जागांचा समावेश आहे. प्रवेशाच्या पहिल्या फेरीत कोटा आणि केंद्रीभूत प्रवेश मिळून २७ हजार २५५ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. पहिल्या फेरीत नामांकित महाविद्यालयांचे पात्रता गुण नव्वदीपार असल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना दुसऱ्या फेरीची प्रतीक्षा होती. आता दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर पात्रता गुणांमध्ये किती फरक पडतो याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
आणखी वाचा-…तर महामार्गांवरील अपघात टाळता येतील! वाहतूकदारांची सरकारकडे मोठी मागणी
शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार २७ ते २९ जूनदरम्यान विद्यार्थ्यांना पहिल्या भागात दुरुस्ती करण्यासह महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची संधी देण्यात आली होती. तर ३ जुलै रोजी गुणवत्ता यादी जाहीर करून प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना ५ जुलैपर्यंत महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. तसेच कोट्याअंतर्गत प्रवेश ५ जुलैपर्यंत सुरू राहणार आहेत.