पुणे : पुणे-सोलापूर महामार्गावर ऊरुळी कांचन परिसरात टायर फाट्याजवळ रविवारी विचित्र अपघात झाला. टेम्पो, दोन मोटारी, दुचाकींची धडक झाल्याने १२ जण जखमी झाले. सचिन कुमार, आशिष कुमार, राज किशोर, रोहित बबनराव गायकवाड, सोनाली रोहित गायकवाड, छबी, रोहित गायकवाड, रामदास आहेरकर, विनोद होसमनी, विवेक होसमनी, शंकर नारळे, बबलू कुवार अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. अपघातात जखमींवर ऊरुळी कांचन परिसरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> निगडीत पलटी झालेल्या टँकरमधील गॅस गळती रोखण्यात १४ तासांनी यश
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर महामार्गावरुन सोलापूरकडे टेम्पो निघाला होता. टेम्पोत बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी प्लेट होत्या. भरधाव टेम्पोचालकाचे नियंत्रण सुटले आणि दुभाजक ओलांडून पुण्याकडे निघालेल्या मोटारीवर आदळला. टेम्पोने आणखी एका मोटारीला धडक दिली. अपघातात एक दुचाकीस्वार जखमी झाला. अपघातात एकूण १२ जण जखमी झाले असून जखमींमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. अपघातानंतर कस्तुरी प्रतिष्ठानचे बापू गिरी, संतोष झोंबाडे, सुरेश वरपे, मिलिंद मेमाणे, रुग्णवाहिका चालक अजित कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्त टेम्पोवर आणखी वाहन आदळल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली.