विवाहाच्या आमिषाने महिलेची १२ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी एकाच्या विरोधात वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सागर उमेश पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव टँकरच्या धडकेने ४८ वाहनांचे नुकसान, ३० ते ३५ जण जखमी
आरोपी सागर पवार याची महिलेशी ओळख झाली होती. पत्नीस दुर्धर विकार झाल्याची बतावणी करुन त्याने महिलेची सहानुभूती मिळवली. त्यानंतर महिलेला प्रेमाच्या जाळ्यात पवारने ओढले. महिलेला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने पैशांची गरज असल्याची बतावणी करुन महिलेकडून सहा लाख रुपये घेेतले. कात्रज भागातील सदनिकेची विक्री करुन पैसे देतो, असे त्याने सांगितले होते.
हेही वाचा- पुणे: हडपसर रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी पीएमपीचे दोन नवे मार्ग
व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून त्याने पुन्हा महिलेकडून दोन लाख रुपये घेतले. पवारने विवाहाच्या आमिषाने महिलेकडून वेळोवेळी १२ लाख रुपये घेतले. त्यानंतर महिलेने विवाहाबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. महिलेने पैसे परत मागितल्यानंतर त्याने महिलेला अश्लील संदेश पाठवून धमकावले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताराम बागवे तपास करत आहेत.