येरवडा येथील डॉन बॉस्को हायस्कूल समोर सकाळी साडेनऊच्या सुमारास सिमेंटच्या ट्रकने सायकलवर निघालेल्या दोघांना मुलांना धडक दिली. यामध्ये एका बारा वर्षांच्या मुलाचा ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. तर, दुसरा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ट्रक चालकास अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी याच ठिकाणी दोन संगणक अभियंत्याचा मृत्यू झाला होता.
नागनाथ बाळासाहेब कांदे (वय १२, रा. जयप्रकाशनगर, येरवडा) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. तर मनीष कानडे हा यामध्ये जखमी झाला आहे. या प्रकरणी ट्रक चालक महादू बाबू हनुमंते (वय ५०, रा. जयजवाननगर, येरवडा) यास अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोल्फ चौकाकडून नागनाथ आणि मनीष हे सायकलवरून जात होते. ट्रक हा सुद्धा त्याच दिशेकडून येत होते. डॉन बॉस्को हायस्कूल समोर सकाळी साडेनऊच्या सुमारास पाठीमागून या ट्रकने सायकलला जोराची धडक दिली. यामध्ये मनीष हा सायकल चालवत असल्याने तो उडून लांब पडला. तर नाथनाथ हा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. मनीष याला उपचासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या ठिकाणी सारखेच अपघात होत असल्याने उपाययोजना करण्याची मागणी या वेळी नागरिकांनी केली. नागनाथ हा महापालिकेच्या नेताजी बोस हायस्कूलमध्ये सातवीत शिकत होता. त्याला दोन भाऊ असून घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 year old boy dies in truck accident in front of don bosco school
Show comments