पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) ताफ्यात महिन्याभरापूर्वी दाखल झालेल्या १२३ नव्या सीएनजी बस सदोष असल्याने त्यांची सेवा संचलनातून बंद करण्यात आली आहे. सर्व बस संबंधित कंपनीकडे माघारी पाठविण्यात आल्या असून, बसमधील तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतरच त्या मार्गांवर सोडण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

पीएमपीने आयुर्मान संपलेल्या बस मोडीत काढत नव्याने आधुनिक बस घेण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार १२३ सीएनजी बस घेण्यात आल्या आहेत. या बसमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि प्रवाशांच्या सोयीसुविधांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात या बस निरनिराळ्या मार्गिकांवरून धावत असताना अचानक बंद पडत असल्याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. या बसमधील आसनक्षमता कमी असल्याच्या तक्रारीही पीएमपी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने १२३ बस तात्पुरत्या स्वरूपात संचलनातून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तांत्रिक व्यवस्थापनाबरोबर चर्चा

हडपसर, नतावाडी, शेवाळवाडीसह अन्य डेपोंमधून या बसचे संचलन सुरू होते. मात्र, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या बस सेवेतून काढून टाकण्यात आल्या आहेत. संबंधित कंपनीच्या तांत्रिक व्यवस्थापन विभागाशीही चर्चा करण्यात आली. त्यामध्ये समस्येचे कारण शोधून उपाययोजना करण्याबाबत सूचना करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘मिडी’बसही बंद पडण्याचे प्रकार?

शहरातील अरुंद रस्ते, गर्दीच्या ठिकाणांवरील मार्गिकांचा अभ्यास करून पीएमपी प्रशासनाने ‘मिडी’ बस सेवा सुरू केली. या बसही सबंधित कंपनीकडून खरेदी करण्यात आल्या आहेत. या मिडी बसही सातत्याने बंद पडत असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

पर्यावरणपूरक बस घेण्यात आल्या आहेत. मात्र, या बस मार्गावर बंद पडण्याचे प्रकार वाढल्याने कंपनीच्या तांत्रिक व्यवस्थापन विभागासोबत बैठका घेण्यात आल्या. मात्र, परिस्थिती कायम असल्याने सेवेवर परिणाम होत आहे. त्याचा प्रवाशांना त्रास होत आहे. त्यामुळे १२३ बस संचलनातून काढण्यात आल्या आहेत. दुरुस्तीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल. – दीपा मुधोळ -मुंडे, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालिका, पीएमपीएमएल