आज दुपारी एक वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत बारावीचा निकाल जाहीर झाला. अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन करून आपला आनंद साजरा केला. दरम्यान पुण्यातील गरवारे महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणानं टोकाचं पाऊल उचललं आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून त्यानं आत्महत्या केली आहे.
निखिल लक्ष्मण नाईक असं आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाचं नाव असून तो पुण्यातील श्रावणधारा वसाहत परिसराती रहिवासी होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल लक्ष्मण नाईक हा आई, वडील आणि मोठा भाऊ यांच्या श्रावणधारा वसाहत परिसरात वास्तव्यास होता. त्याची आई घरकाम करते, तर वडील मोलमजुरीच काम करतात. मृत निखिल गरवारे महाविद्यालयात वाणिज्य शाखेत इयत्ता बारावीच्या वर्गात शिकत होता.
आज दुपारी १ च्या सुमारास बारावी परीक्षेचा निकाल लागला. निखिलने ऑनलाइन पद्धतीने आपला निकाल तपासला. त्यामध्ये नापास झाल्याचं समजताच त्याने इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत निखिलचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती कोथरूड पोलिसांना देण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.