पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या माध्यमांतून राज्यभरात उद्या ११ फेब्रुवारी २०२५ पासून बारावीची सुरू होत आहे. या परीक्षेला १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली, तर ३७ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तर १० हजार ५५० कनिष्ट महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शरद गोसावी म्हणाले, पुणे, नागपूर, संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळाअंतर्गत १२ वीच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होत आहे. यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा १० दिवस अगोदर होत आहे. ही परीक्षा लवकर घेतल्याने निकाल लवकर लागेल. १५ मे पर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे.
राज्यभरात यंदा १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी बसले आहेत.त्यामध्ये विज्ञान शाखेला ७ लाख ६८ हजार ९६७ विद्यार्थी, कला शाखेला ३ लाख ८० हजार ४१० विद्यार्थी, वाणिज्य शाखेला ३ लाख १९ हजार ४३९ विद्यार्थी तर किमान कौशल्य आधारित अभ्यासक्रम ३१ हजार ७३५ विद्यार्थी टेक्निकल सायन्स ४ हजार ४८६ असे एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले, परीक्षा काळात संभाव्य गैरप्रकारांना आळा बसावा, या दृष्टीने मंडळामार्फत संपूर्ण राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली. तर मागील पाच वर्षाच्या काळात ८१८ केंद्रावर सातत्याने गैरप्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे ती सर्व केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास, पुणे १२५, नागपूर १०४, छत्रपती संभाजीनगर २०५, मुंबई ५७, कोल्हापूर ३९, अमरावती १२४, नाशिक ८८, लातूर ७३, कोकण ३ ही एकूण ८१८ केंद्र आहेत. या सर्वांवर विशेष लक्ष मंडळाचे असणार असल्याचे त्यांनी सांगितले.