बुलढाणा, पुणे : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर शुक्रवारी बारावीची गणिताची प्रश्नपत्रिका परीक्षा सुरू होण्यापूर्वीच फुटली. या प्रश्नपत्रिकेची छायाचित्र स्वरूपातील दोन पाने समाजमाध्यमांवर पसरली. या प्रकाराची दखल घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला असून राज्य मंडळाने चौकशीही सुरू केली आहे.
राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी म्हणाले, ‘‘प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना ११ वाजता वितरित करण्यापूर्वी पाच मिनिटे आधी पाकीट उघडावे लागते. समाजमाध्यमांत पसरलेल्या प्रश्नपत्रिकांच्या दोन पानांच्या छायाचित्रांची तपासणी केली असता १० वाजून ५७ मिनिटांनी संबंधित छायाचित्र काढल्याचे निदर्शनास आले.’’
दरम्यान, प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत आवाज उठवला. त्यामुळे अमरावती मंडळाने तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. प्रश्नपत्रिका कुठे फुटली हे अद्याप समजलेले नाही. मात्र सिंदखेडराजा पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी रंगनाथ गावडे यांनी शुक्रवारी दुपारी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. प्रश्नपत्रिका कुठे व कशी फुटली याची चौकशी पोलीस करणार आहेत.
प्रश्नपत्रिका फुटीची दखल घेऊन गटशिक्षणाधिकारी गावडे यांनी सर्व परीक्षा केंद्रांना भेट देऊन कठोर तपासणी केली. प्रश्नपत्रिका फुटल्याची माहिती मिळताच शिक्षण पर्यवेक्षक जगन्नाथ मुंडे यांनी सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील परीक्षा केंद्राची पाहणी करून प्रश्नपत्रिका कुठे फुटली याची चौकशी केली. त्यानंतर गावडे यांनी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
यंदा दहावी-बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत म्हणून कॉपीमुक्त अभियान राबवण्यात येत आहे. तसेच विविध उपाययोजनाही करण्यात येत आहेत. असे असूनही गैरप्रकार घडत आहेत. पुणे जिल्ह्यातील दौंड येथे झालेल्या गैरप्रकारात काही शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आता शुक्रवारी गणिताच्या प्रश्नपत्रिकेची दोन पाने समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याचे आढळले.
कॉपीप्रकरणी दोन विद्यार्थी निलंबित
साखरखेर्डा येथील एसईएस तथा ज्युनियर कॉलेजमध्ये तपासणी करण्यात आली. यावेळी दोन विद्यार्थ्यांना भरारी पथकातील देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम धनमने यांनी निलंबित केले आहे. कॉपीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
‘फेरपरीक्षा नाही’
मुंबई: प्रश्नपत्रिका फुटली असली तरी ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे आढळले नाही. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले. सकाळच्या सत्रात १०.३० वाजेपर्यंत आणि दुपारच्या सत्रात दु. २.३० वाजेपर्यंत परीक्षा दालनात परीक्षार्थीनी उपस्थित राहणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे फुटलेली प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्याचे राज्यात कोठेही आढळले नाही, असे मंडळाने म्हटले आहे.
प्रश्नपत्रिकेचे छायाचित्र विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता कमी आहे. मात्र चौकशी सुरू करण्यात आली आहे. हा प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ