बारावीची परीक्षा गुरुवारपासून सुरू होत असून या वर्षी राज्यभरात १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थ्यांनी आणि पुणे विभागातून २ लाख १२ हजार ६११ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.
राज्यात २१ फेब्रुवारी ते २६ मार्च या कालावधीमध्ये बारावीची परीक्षा होणार आहे. पुणे विभागामध्ये पुणे, नगर, सोलापूर अशा तीन जिल्ह्य़ांचा समावेश असून तिन्ही जिल्ह्य़ांमध्ये मिळून २२९ केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे. पुणे विभागामध्ये १ लाख २४ हजार ८७८ विद्यार्थी आणि ८७ हजार ७३३ विद्यार्थिनी परीक्षेला बसणार आहेत. परीक्षा सुरळीत होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्य़ात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती स्थापन करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात घडणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ६० भरारी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा कालावधीमध्ये विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी समुपदेशन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली असून विद्यार्थ्यांना, मुख्याध्यापकांना परीक्षेसंबंधी कोणतीही अडचण निर्माण झाल्यास त्यांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागीय मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक (०२०) ६५२९२३१६ आणि ६५२९२३१७ असे आहेत.