बारावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील बी संचातील पाचवा प्रश्न सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना चक्क सात गुणांची लॉटरी लागली आहे. प्रश्नपत्रिकेतच हा प्रश्न चुकल्यामुळे तो सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट सात गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी सांगितले.
बारावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा शनिवारी झाली. इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेतील बी संचातील पाचवा प्रश्न चुकल्याचे मॉडरेटर्सच्या लक्षात आले. त्यामुळे हा प्रश्व सोडवणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट सात गुण देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे. बी संच प्रश्नातील पाचवा प्रश्न हा वाचन आणि आकलन कौशल्यावर आधारित होता. उताऱ्यावरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांना द्यायची होती. ‘थारंटन वाईल्डर’ या लेखकाच्या पुस्तकातील उतारा देण्यात आला होता. या उताऱ्यातील एका पात्राचे नाव प्रश्नसंचात चुकीचे छापले गेले होते. त्यामुळे विचारण्यात आलेल्या प्रश्नाचा संदर्भ लागत नव्हता. ही बाब लक्षात आल्यानंतर हा चुकीचा आणि संदर्भ न लागणारा प्रश्न सोडवण्याचे धाडस दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट सात गुण देण्याचा निर्णय राज्य मंडळामार्फत घेण्यात आला. बारावीसाठी इंग्रजी हा अनिवार्य विषय असून या परीक्षेला १२ लाख ९४ हजार ३६३ विद्यार्थी बसले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा