चंदननगर परिसरातील खासगी जलतरण तलावात बुडून १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. दुर्घटना घडली तेव्हा जलतरण तलाव परिसरात जीवरक्षक नसल्याच्या आरोप मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. अतिक नदीम तांबोळी (वय १३,रा. गणेशनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
हेही वाचा >>> सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदननगर भाागतील संघर्ष चौकात खालसा जिम आहे. खालसा जिमच्या आवारात जलतरण तलाव आहे. मंगळवारी दुपारी अतिक आणि त्याचे मित्र जलतरण तलावात पोहण्यासाठी गेले होते. त्यावेळी दमछाक झाल्याने अतिक जलतरण तलावात बुडाला. अतिक तलावात बुडाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांनी आरडाओरडा केला. व्यायामशाळेतील तरुणांनी पाण्यात बुडालेल्या अतिकला बाहेर काढले. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तलावाच्या परिसरात जीवरक्षक नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. अतिक वडगाव शेरी परिसरातील एका शाळेत आठवीत शिकत होता. काही महिन्यांपूर्वी तो पोहायला शिकला होता, अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली.