पिंपरी : आशिया खंडातील सर्वांत श्रीमंत महापालिका असा एकेकाळी लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विविध पदांसाठी भरती होऊनही १३९ जणांनी नोकरी नाकारली आहे. महापालिकेपेक्षा राज्य शासनाच्या इतर विभागांत जास्त वेतन मिळत असल्याने या उमेदवारांनी महापालिकेच्या नोकरीवर पाणी सोडले आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार आहे.

महापालिकेच्या वतीने गेल्या वर्षी नोकर भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. विविध ११ पदांच्या ३५४ जागांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. त्यात सर्वाधिक २१३ जागा लिपिक पदासाठी होत्या. त्या खालोखाल स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ७४, कनिष्ठ अभियंता स्थापत्य ४७, कनिष्ठ अभियंता विद्युत १८ जागांचा समावेश होता. आरक्षणानुसार निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने पत्रव्यवहार करून बोलावून घेतले. निवड झालेल्यांना नियुक्तिपत्रही देण्यात आले. मात्र, ४६ उमेदवार पोलीस पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीसाठीचे पत्र घेण्याकरिता गैरहजर राहिले, तर १३ जणांनी पोलीस पडताळणी अहवाल सादर केला नाही.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडमध्ये अपघाताच सत्र थांबता थांबेना!; निगडित चारचाकीने दोघांना दिली धडक

पाच जणांनी वैद्यकीय अहवाल सादर करण्यास नकार दिला, तर नेमणुकीचा आदेश दिल्यानंतरही २५ जण मुदतीत रुजू झाले नाहीत. याशिवाय ४९ जणांनी महापालिकेत रुजू होणार नसल्याचे कळविले. १३ जण महापालिकेत रुजू झाले. पण, काही दिवसांत त्यांनी राजीनामा दिला. ज्यांनी चारित्र्य वर्तणूक पडताळणी आणि शारीरिक पात्रता तपासणी करून घेतली नाही, याबाबत महापालिकेस काहीच कळविले नाही, अशा उमेदवारांना नोकरीची आवश्यकता नाही, असे समजून त्यांची निवड रद्द केली. तर, ज्यांनी राजीनामा दिला, ते मंजूर केले आहेत. त्यांच्या जागी आता प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची निवड करण्यात येत आहे.

कमी वेतनामुळे महापालिकेच्या नोकरीवर पाणी?

महापालिकेच्या नोकरभरतीसोबतच शासनाच्या इतर विभागांसाठीही परीक्षा झाली होती. महापालिकेच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार दुसऱ्या परीक्षाही उत्तीर्ण झाले होते. महापालिकेपेक्षा शासनाच्या सहकार, जलसंपदा, महसूल, नगर परिषदा, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये अधिक वेतन मिळते. त्यामुळे १३९ उमेदवारांनी महापालिकेपेक्षा शासनाच्या नोकरीला प्राधान्य दिले आहे.

हेही वाचा : पिंपरी : चऱ्होलीत नवीन आयटी पार्क; किती जणांना मिळणार रोजगार?

महापालिकेत २४५ जण रुजू झाले आहेत. विविध कारणांनी १३९ उमेदवारांची नेमणूक रद्द करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना पोलीस पडताळणी, वैद्यकीय तपासणीकरिता बोलविण्यात आले असल्याचे महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सांगितले.