पुण्यात १९ मे रोजी पोर्श कार अपघातात दोन संगणक अभियंत्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा तपास पुढे जात असताना ससून रुग्णालयातील न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजय तावरे आणि इतर दोघांना अटक करण्यात आली. डॉ. तावरे आणि अल्पवयीन आरोपीचे वडील यांच्यादरम्यान त्या रात्री रक्ततपासणीचे नमुने घेण्याच्या दोन तास आधी १४ वेळा फोनवरून संभाषण झाले असल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली. डॉ. तावरे आणि इतर दोघांनी आरोपीच्या कुटुंबाकडून रक्त नमुने बदलण्यासाठी लाच घेतली असून पुढील चौकशीसाठी त्यांची कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी सोमवारी न्यायालयात केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन आरोपीचे रक्त नमुने घेतल्यानंतर ते कचऱ्याच्या कुंडीत फेकण्यात आले, त्याऐवजी दुसऱ्याच व्यक्तीचे रक्त घेऊन ते तपासणीसाठी पाठविले. आरोपीच्या रक्तचाचणीत मद्याचा अंश दिसू नये, यासाठी सदर गुन्हा करण्यात आला. डॉ. तावरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीहरी हळनोर आणि शवागरात काम करणाऱ्या अतुल घाटकांबळे यांना अटक केल्यानंतर त्यांच्याशी संबंधित ठिकाणावर पोलिसांनी धाड टाकली. डॉ. हळनोरच्या घरातून अडीच लाख आणि घाटकांबळेच्या घरातून ५० हजारांची रोकड जप्त करण्यात आली.
वरीष्ठ पोलीस निरीक्षकाने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, हळनोर आणि घाटकांबळे यांच्या घरात सापडलेली रोकड ही या प्रकरणी घेतलेल्या लाचेची असू शकते. पण आमचा रोख हा डॉ. तावरे यांनी केलेल्या आर्थिक व्यवहारांवर आहे. त्याला किती पैसे मिळाले किंवा काय त्याला इतर काही देण्यात आले आहे का? याचा तपास केला जात आहे. तसेच अल्पवयीन आरोपीचा रक्त नमुने बदलण्यामध्ये डॉ. तावरे यांची प्रमुख भूमिका होती. आरोपीच्या रक्त तपासणीत मद्याचा अंश मिळू नये, म्हणून पुराव्यांशी छेडछाड करण्याचा प्रयत्न झाल्याचेही पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी डॉ. तावरे यांच्या पुणे कॅम्पमधील निवासस्थानाची झडती घेतली.
ससूनमधील डॉ. अजय तावरेंची वादग्रस्त कारकिर्द; मूत्रपिंड रॅकेटपासून आमदाराच्या शिफारसपत्रापर्यंत…
आणखी एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अल्पवयीन मुलाच्या रक्ताचा नमुना १९ मे रोजी सकाळी ११ च्या सुमारास ससून रुग्णालयात घेण्यात आला. आरोपीचे वडील आणि डॉ. तावरे यांचे कॉल रेकॉर्ड तपासले असता रक्ततपासणी करण्याच्या दोन तास आधी त्या दोघांमध्ये १४ वेळा संभाषण झाल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपीच्या वडीलांनी काही कॉल व्हॉट्सॲप, फेसटाइम आणि स्टँडर्ड सेल्युलर कनेक्शनवरही केले आहेत. या कॉल रेकॉर्डची तांत्रिक तपासणी करण्यात येत आहे. तसेच आरोपीचे वडील आणि डॉ. तावरे हे थेट संपर्कात होते किंवा त्यांच्यात कुणी मध्यस्थी करत होता का? याचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.