पुणे : बनावट इमेलद्वारे सायबर चोरट्यांनी एका बांधकाम व्यावसायिक कंपनीतील अधिकाऱ्याची १४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे सहायक व्यवस्थापक सतीश पंढरीनाथ दौंडकर (रा. खराडी ) यांनी या संदर्भात मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या एका प्रतिनिधीच्या मेल आयडीचा वापर करून चोरट्यांनी फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
चोरट्यांनी त्या मेलवरून कंपनीच्या अधिकाऱ्यांना बँकेच्या खात्यावर १४ लाख रुपये पाठवण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी १४ लाख रुपये चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात पाठविली. लेखापरीक्षात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.