पुणे : शेअर बाजारात गुंतवणूक, तसेच ऑनलाइन पद्धतीने घरातून कामाची संधी, असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनेत दोन महिलांची १३ लाख ७४ हजार फसवणूक केली.
याबाबत कोथरुड भागात राहणाऱ्या एका ५३ वर्षीय महिलेने अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले. महिलेला चोरट्यांनी एका बँक खात्यात रुपये भरण्यास सांगितले. महिलेने वेळोवेळी आठ लाख ५० हजार रुपये बँक खात्यात जमा केले. सुरुवातीला महिलेला परताव्यापोटी काही रक्कम देण्यात आली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा दिला नाही. महिलेने चोरट्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मोबाइल क्रमांक बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
हेही वाचा >>>सदाशिव पेठेत दोन सदनिकांमधून १८ लाखांचा ऐवज चोरी
ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखवून वारजे भागातील एका महिलेची पाच लाख २४ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत एका ५५ वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर संदेश पाठविला. ऑनलाइन पद्धतीने घरातूनकाम केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले. चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांनी परतावा दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस निरीक्षक मनोज शेडगे तपास करत आहेत.