काळेवाडीत राहणाऱ्या एका सामान्य वर्गातील कष्टकऱ्याला पाच महिन्यांचे घरगुती वापरासाठीचे तब्बल १४ लाख ४२ हजार रुपये वीजबिल आले आहे. नेहमी हजाराच्या आत बिल येत असताना हे आकडे पाहून संबंधित व्यक्तीचे डोळे पांढरे झाले आहेत. महावितरण कंपनीकडे त्याने अनेक खेटे घातले, मात्र दाद तर मिळाली नाहीच, बिल न भरल्याने वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने महिन्याभरापासून हे कुटुंब अंधारात आहे.
काळेवाडीतील पांडुरंग गाडे या कष्टकरी कामगारावर हे ‘विजेचे संकट’ कोसळले आहे. दोन खोल्यांचे जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांचे १४ लाख ४२ हजार रुपये बिल त्यांना आले. बिलाचे आकडे पाहून गाडे यांना धक्का बसला. नेहमी हजाराच्या आत बिल येत असल्याने एवढे बिल येऊच शकत नाही, याची खात्री असल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीकडे पाठपुरावा सुरू केला. मात्र, त्यांना कोणीही दाद दिली नाही. बिल भरले नाही म्हणून पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई तातडीने करण्यात आली. त्यामुळे गाडे कुटुंबीयांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज नसल्याने पाणी येत नाही, मुलांना अभ्यास करता येत नाही. वीज वितरण अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले असून, यासंदर्भात बोलण्यासाठी कोणीही तयार नाही.

Story img Loader