पुणे : विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित असल्याचे स्पष्ट होत आहे. आतापर्यंत १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण विभागाने दिली. तसेच विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित न ठेवण्याच्या सूचना उच्च शिक्षण विभागाने उच्च शिक्षण संस्थांना दिल्या.
महाडीबीटी संकेतस्थळावरील शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी महाविद्यालय स्तरावर करण्याबाबत यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र त्यानंतरही शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहत असल्याचे दिसून येत आहे. उच्च शिक्षण विभागाने प्रलंबित अर्जाच्या प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत पडताळणीसाठी सुमारे १४ हजार ५७७ अर्ज प्रलंबित असल्याची माहिती उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी परिपत्रकाद्वारे दिली.
हेही वाचा – नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे साडेसात हजार झाडे बाधित; महापालिका ६५ हजार देशी झाडे लावणार
विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांवर दररोज कार्यवाही होणे आवश्यक आहे. तसेच विद्यार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याचा शिष्यवृत्ती लाभ देण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची महाविद्यालय स्तरावर पडताळणी होणे आवश्यक आहे. प्रलंबित अर्जामुळे संबंधित विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाइन अर्ज करता येत नाही. त्यामुळे सर्व अर्जांची पडताळणी वेळेत होणे आवश्यक आहे. तसेच विद्यापीठ स्तरावर शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित राहणार नाहीत, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. पडताळणीअभावी प्रलंबित अर्जासोबत भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणींना संबंधित विद्यापीठाचे कुलसचिव आणि महाविद्यालयाचे प्राचार्य जबाबदार राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले.
चौकट
महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्जाची संख्या ६ हजार ३५५ आहे. यात २०२०-२१ पासून २०२२-२३ या तीन वर्षांतील शिष्यवृत्ती अर्ज प्रलंबित आहेत. तसेच दुसऱ्या हप्त्यासाठी महाविद्यालय स्तरावर गेल्या चार वर्षांत ८ हजार २२२ अर्ज प्रलंबित आहे. तर एकूण प्रलंबित अर्ज १४ हजार ५७७ आहेत.