महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांची माहिती संकेतस्थळावरून नष्ट झाल्यानंतर उमेदवारांना माहिती पुन्हा भरण्यासाठी बुधवापर्यंतचा (१७ एप्रिल) वेळ देण्यात आला होता. ती संपली तरी राज्यातील साधारण १५ ते २० हजार उमेदवारांनी अजूनही त्यांची माहिती अद्ययावत केली नाही, असे आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी बुधवारी सांगितले. मात्र, माहिती अद्ययावत करूनही ती पुन्हा पुसली जात असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळाला ‘व्हायरस’ चा फटका बसल्याने राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी बसलेल्या सर्व उमेदवारांची माहिती नष्ट झाली होती. उमेदवारांची माहिती आणि त्याचा बॅकअप एकाच हार्डडिस्कवर ठेवण्याचा निष्काळजीपणा आयोगाला भोवला होता. या पाश्र्वभूमीवर परीक्षा देणारे उमेदवार, क्लास चालक, विद्यार्थी संघटना, राजकीय संघटना यांनी आवाज उठवला होता. नियोजित वेळापत्रकानुसार ७ एप्रिलला होणारी परीक्षा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलून त्यानंतर उमेदवारांना १७ तारखेपर्यत माहिती अद्ययावत करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. मात्र अजूनही राज्यातील १५ ते २० हजार उमेदवारांनी त्यांची माहिती अद्ययावत केलेली नाही. याबाबत आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी सांगितले, ‘‘उमेदवारांना आता वेळ वाढवून देण्यात येणार नाही. साधारणपणे दरवर्षी १५ ते २० हजार उमेदवार परीक्षेचा अर्ज भरतात, पण परीक्षेला बसत नाहीत. मात्र, या उमेदवारांना एसएमएस पाठवला जाईल आणि परीक्षेची तारीख जाहीर झाल्यानंतर त्यांच्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल. परीक्षेची तारीख आयोगाच्या बैठकीमध्ये ठरवण्यात येईल.’’
उमेदवार मात्र माहिती भरूनही ती प्रोफाईलवर अजूनही दिसत नसल्याची तक्रार करत आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावरून माहिती पुसली गेल्यानंतर १२ एप्रिलच्या सुमारास काही उमेदवारांची माहिती आपोआपच पूर्वस्थितीत येऊन त्यांना माहिती भरली गेल्याचे एसएमएस आले होते. तर काही उमेदवारांनी मात्र माहिती पुन्हा भरूनही त्यांची माहिती भरली गेली नसल्याचे दिसून येत आहे. या परीक्षेसाठी तीन लाख पंचवीस हजार उमेदवार बसले आहेत.