‘देशातील सुमारे १५ कोटी नागरिक उच्च रक्तदाबाच्या विकाराने (हायपरटेन्शन) ग्रस्त असून वेळीच प्रतिबंध न केल्यास हा विकार मानवजातीसाठी गंभीर ठरू शकतो.’, असे मत आम्र्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे (एएफएमसी) संचालक कमांडंट एअर मार्शल बी. केशव राव यांनी व्यक्त केले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्त देशातील जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि एएफएमसी यांच्यातर्फे परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी झालेल्या बीजभाषणात राव बोलत होते.   
जहाँगीर रुग्णालयाचे मेडिसिन कन्सल्टंट डॉ. किरणजित सिंग, सिंबायोसिस स्कूल ऑफ मेडिकल सायन्सेसचे सहयोगी प्राध्यापक डॉ. शैलेश देशपांडे, पुणे विद्यापीठाच्या ‘सोशल एपिडेमिक’ विषयाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ. आरती नगरकर, कुंजीरवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलिमा इनामदार आणि ‘युनेस्को सेंटर ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन’चे माजी संचालक ब्रदर फ्रेडरिक लबार्थे आदी या परिसंवादात सहभागी झाले होते.   
राव म्हणाले, ‘‘देशातील सुमारे १५ कोटी नागरिक उच्च रक्तदाबाच्या विकाराने ग्रस्त आहेत. शहरी भागात या विकाराचे प्रमाण २० ते ४० टक्के तर ग्रामीण भागात ते १२ ते १७ टक्के आहे. मात्र उच्च रक्तदाबाच्या पूर्वलक्षणांचे प्रमाण ६० ते ७० टक्के इतके जास्त आहे. वेळीच प्रतिबंध न केल्यास हे मानवजातीसाठी संकट ठरू शकेल. सुरुवातीपासूनच नियमित आरोग्य तपासण्या करून घेण्याने या विकाराला प्रतिबंध घालणे शक्य होईल.’’
डब्ल्यूएचओतर्फे यंदाच्या जागतिक आरोग्य दिनासाठी उच्च रक्तदाब हा विषय निवडण्यात आला आहे.