बोरज (ता. मावळ) येथे रस्त्याच्या कडेला साठलेल्या पाण्यामध्ये सापडलेल्या तब्बल १५ फूट लांबीच्या अजगराची सुटका करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याची कामगिरी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी बजावली. गावाच्या जवळ असलेल्या ओहोळामध्ये लांब प्राणी पडलेला दिसत असून त्याची हालचाल होत नाही, अशी माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या कार्यकर्त्यांना समजली. वनविभागाला संबंधित घटनेची माहिती देऊन, कार्यकर्त्यांचे पथक प्राण्याच्या सुटकेसाठी निघाले. बोरज येथे घटनास्थळी पोहोचताच, हे लांब जनावर म्हणजे तब्बल १५ फूट लांबीचा पूर्ण वाढलेला अजगर असल्याचे लक्षात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> राजस्थानातील तरुणाकडून ६० लाखांची अफू जप्त

काही तरी भक्ष्य गिळले असल्याने या अजगराचे शरीर वाढले असल्याचे दिसले. त्याच्या पोटाकडील भाग फुगीर दिसत होता. त्यामुळेच अजगराची हालचाल अगदी मंद होती. पथकाच्या सदस्यांनी एकत्रित प्रयत्नांनी अजगराचे ते प्रचंड धूड सावकाश उचलले आणि खुल्या जागी आणले. तेव्हा त्याची लांबी तब्बल १५ फूट भरली. अजगराची प्राथमिक आरोग्य तपासणी करून त्याला पुन्हा सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा परिसर लोकांच्या येण्या-जाण्याचा आणि उघड्यावरील असल्याने तसेच आसपास आदिवासी वस्ती असल्याने अजगराच्या जिवाला धोका संभवण्याची शक्यता दिसली. त्यामुळे वनविभागाच्या परवानगीनुसार या महाकाय अजगराला परिसरातील वनविभागाच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. वन्यजीव रक्षक मावळच्या या पथकात अनिल आंद्रे, जिगर सोलंकी, दक्ष काटकर, यश वाडेकर, तेजस केदारी, मोरेश्वर मांडेकर, किरण तिकोणे यांचा समावेश होता.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 foot long python rescued and released in forest pune print news vvk 10 zws
Show comments