विजेचा खोळंबा.. चुकीचे वीजबिल.. यंत्रणेतील सातत्याचा घोटाळा.. आदी गोष्टींमधून अनेकदा ग्राहकांना झटका देणाऱ्या महावितरण कंपनीने हाती घेतलेल्या त्रिसूत्री या एकदिवसीय कार्यक्रमातून नागरिकांना चक्क सुखद धक्का देण्यात येत आहे. पुणे परिमंडलातील ग्रामीण भागापासून सुरू झालेला हा कार्यक्रम आता पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही राबविण्यात येत आहे. गुरुवारच्या दिवशी शहरातील वेगवेगळ्या भागामध्ये एकाच वेळी नागरिकांच्या तक्रारीनुसार वीजयंत्रणेची दुरुस्ती, वीजबिले व मीटरच्या तक्रारींचे निवारण, मागेल त्याला नव्या वीजजोडण्या देण्याचे काम केले जाते. शहर विभागातील पहिल्याच त्रिसूत्री कार्यक्रमात एकाच दिवशी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील १४ ठिकाणी नागरिकांची सुमारे अडीच हजार कामे पूर्ण करण्यात आली.
पुणे परिमंडलामध्ये सुरुवातीला ग्रामीण भागामध्ये त्रिसूत्रीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता शहरी भागामध्ये या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नागरिकांना अद्याप या कार्यक्रमांची माहिती नाही. त्यामुळे जनमित्रांच्या माध्यमनातून हा कार्यक्रम नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मागील आठवडय़ात गुरुवारी रामटेकडी, गाडीतळ, येरवडा, शिवणे, भिलारेवाडी, गंज पेठ, भवानी पेठ, इंदिरानगर, पानमळा, जनता वसाहत, खडकी, मंगळवार पेठ, िपपरी गाव, भोसरीतील महात्मा फुलेनगर आदी ठिकाणी त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनुसार झुकलेले वीजखांब सरळ करणे, फिडर पिलरची दुरुस्ती, लघु व उच्चदाबाच्या वीजतारांची दुरुस्ती, सव्र्हीस वायर बदलणे, झाडांच्या फांद्या तोडणे, रोहित्रांना संरक्षक जाळी बसविणे आदी स्वरूपाची दीड हजारांहून अधिक कामे करण्यात आली. वीजबिलांच्या दुरुस्ती व तक्रारी निवारणामध्ये बिलांची दुरुस्ती, रीडिंग होत नसलेल्या मीटरचे रीिडग घेणे, मीटर घराबाहेर लावणे या प्रकारची ७४४ कामे करण्यात आली. महावितरण आपल्या दारी या उपक्रमात १५२ नवीन वीजजोड देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, ९० वीजजोड कार्यान्वित करण्यात आले.
पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता रामराव मुंडे यांनी प्रत्यक्ष विविध ठिकाणी भेटी देऊन कामांच्या दर्जाची पाहणी केली. अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, महेंद्र दिवाकर, कार्यकारी अभियंता गुलाबराव कडाळे, गणेश एकडे, किशोर गोर्डे, आनंद रायदुर्ग, ज्ञानदेव पडळकर, दिनेश अग्रवाल, धनंजय औंढेकर, धर्मराज पेठकर, संदीप शेंडगे आदींसह ९३ अभियंते व साडेसातशे कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात एकाच वेळी सहभाग घेतला. शहरात पुढील काळातही गुरुवारी वेगवेगळ्या भागांमध्ये त्रिसूत्रीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा