शिक्षणाचे माहेर असणाऱ्या पुणे शहरातील जवळपास दीड हजार विद्यार्थी शाळाबाह्य़ असल्याचे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. मात्र, सिग्नलवर आणि बांधकामांच्या ठिकाणी पाहणीच करण्यात आली नसल्याचे आक्षेपही या सर्वेक्षणावर घेण्यात येत आहेत.
राज्यभर शाळाबाह्य़ मुलांचा शोध शनिवारी घेण्यात आला. शाळेत दाखल न झालेली मुले, शाळा अर्धवट सोडलेली मुले, अपंग, बालकामगार यांची नोंद या सर्वेक्षणादरम्यान करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा असणाऱ्या, शिक्षणाचे माहेरघर म्हणून मिरवणाऱ्या पुण्यात सहा ते १४ या वयोगटातील १ हजार ६८३ विद्यार्थ्यांची शाळेत नोंद झालीच नसल्याचे समोर आले आहे. पुणे शहरातील ६ लाख ६१ हजार ४१२ घरांची पाहणी करण्यात आली होती. मात्र, सिग्नलवर वस्तू विकणारी, भीक मागणारी मुले, पुण्यातील काही भागांतील बांधकामावरील मजुरांची मुले यांच्यापर्यंत प्रगणक पोहोचले नसल्याचा आक्षेपही स्वयंसेवी संस्थांनी नोंदवला आहे.
पुणे शहर वगळता जिल्ह्य़ाच्या परिसरात १ हजार ४४२ विद्यार्थी शाळाबाह्य़ असल्याचे समोर आले आहे. पुणे जिल्ह्य़ात दौंड तालुक्यात सर्वाधिक म्हणजे २१२ शाळाबाह्य़ विद्यार्थी आढळले आहेत. सर्वात कमी म्हणजे १० विद्यार्थी वेल्हा तालुक्यात आढळले आहेत. त्याशिवाय आंबेगावमध्ये ३५, बारामतीत १९१, भोरमध्ये ३६, हवेलीत १३१, इंदापूरमध्ये ८०, जुन्नरमध्ये ७२, खेडमध्ये १६३, मावळमध्ये ११४, मुळशीत ११९, पुरंदरमध्ये ८२ आणि शिरूरमध्ये १२५ विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे. या विद्यार्थ्यांचे येत्या आठ दिवसांत आधार कार्ड तयार करून त्यांना शाळेत प्रवेश देण्याची शासनाची योजना आहे.
पुणे शहरात दीड हजार विद्यार्थी शाळाबाह्य़
शिक्षणाचे माहेर असणाऱ्या पुणे शहरातील जवळपास दीड हजार विद्यार्थी शाळाबाह्य़ असल्याचे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे.
First published on: 06-07-2015 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1500 students away from school in pune