एरवी शांत असणाऱ्या, थोडेसे गूढ वाटावे असे वातावरण असणाऱ्या लाल देऊळ म्हणजे ओव्हल डेव्हिड सिनेगॉगचा परिसर रविवारी गजबजून गेला होता. सर डेव्हिड ससून यांच्या वंशजाची हजेरी, प्रार्थना. श्रद्धा, अभिमान आणि उत्साह अशा वातावरणात या सिनेगॉगचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी (१५०) वर्धापन दिन समारंभ झाला.
आशिया खंडातील हे सर्वात मोठे सिनेगॉग स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आहे. सर डेव्हिड ससून यांनी ५ नोव्हेंबर १८६४ रोजी या सिनेगॉगची उभारणी केली. यावर्षी त्याला १५० वर्षे पूर्ण होत आहेत. ऐतिहासिक वारसा असलेल्या या इमारतीची पुण्यातील साधारण १०० ते १५० ज्यू कुटुंबांनी जपणूक केली आहे. या सिनेगॉगच्या दीडशेव्या वर्धापनदिनी शहरातील ज्यू नागरिकांबरोबरच मुंबई, इस्त्रायल, अमेरिकेतूनही ज्यू नागरिक या समारंभासाठी आले होते. सिनेगॉगचा परिसर रोषणाईने सजला होता. सर डेव्हिड ससून यांचे वंशज रब्बी याकूब मेनसाह यांची हजेरी उपस्थितांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली होती. या सिनेगॉगच्या आजपर्यंतच्या प्रवासाच्या छायाचित्रांचे छोटेखानी प्रदर्शनही भरवण्यात आले होते.
या समारंभाला राज्यपाल विद्यासागर राव, इस्त्रायलचे राजदूत डेव्हिड अकोव्ह, उद्योगपती सायरस पूनावाला, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, सिनोगॉगचे अध्यक्ष सोलोन सोफर आदी उपस्थित होते. या वेळी राव म्हणाले, ‘भारतात फक्त पाच हजार ज्यू नागरिक आहेत. भारताचे इस्त्रायलबरोबरचे संबंध दृढ होण्यात ज्यू धर्मीयांचा मोठा वाटा आहे. देशाच्या संस्कृतीशी एकरूप होऊन ज्यू नागरिक राहात आहेत. त्यांच्या संस्कृतीचे जतन होणे आवश्यक आहे.’
 
ज्यूंच्या संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा – विद्यासागर राव
‘देशातील ज्यू नागरिकांनी शिक्षण, आरोग्य, उद्योग अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे. सर डेव्हिड ससून यांनी केलेल्या कार्याचा पुणे आणि मुंबईच्या विकासात मोठा वाटा आहे. त्यांनी उभ्या केलेल्या संस्था आजही प्रगतीला पूरक ठरत आहेत. देशातील ज्यू संस्कृतीबाबत आणि सर ससून यांच्या कार्याचा शालेय अभ्यासक्रमात समावेश होणे गरजेचे आहे,’ असे मत राज्यपाल विद्यासागर राव यांनी व्यक्त केले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा