लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : चिखली, कुदळवाडी भागात सलग तिसऱ्या दिवशीही अतिक्रमण कारवाई करण्यात आली. तीन दिवसांत २७६ एकरवरील १ हजार ५११ अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
शहरातील नियोजित विकास आरक्षणे आणि नागरिकांच्या सुविधांसाठी असलेल्या जागेवरील अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदामे, भंगार दुकाने तसेच अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून यापुढेही ती चालू राहणार आहे.
महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि क्षेत्रीय धडक कारवाई पथकांमार्फत करण्यात आलेल्या या कारवाईमध्ये सोमवारी ३३ लाख ५८ हजार १३० चौरस फूट बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. त्यामध्ये ६८२ बांधकामांचा समावेश होता.
या कारवाईमध्ये महापालिका अतिक्रमण धडक कारवाई पथकामधील चार कार्यकारी अभियंते, १६ उपअभियंते, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १८० जवान, ६०० पोलीस आणि मजूर कर्मचारी सहभागी झाले होते. १६ पोकलेन, आठ जेसीबी, एक क्रेन आणि चार कटर यांचा वापर निष्कासन कारवाईमध्ये करण्यात आला. शिवाय तीन अग्निशमन वाहने आणि दोन रुग्णवाहिका देखील येथे तैनात करण्यात आल्या होत्या. महापालिका यंत्रणेसह पोलीस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी देखील सहभागी झाले होते.
कुदळवाडी आज अखेरपर्यंत करण्यात आलेली कारवाई
८ फेब्रुवारी – ४२ एकर
९ फेब्रुवारी – १५७ एकर
१० फेब्रुवारी – ७७ एकर
एकूण – २७६ एकर
जमीनदोस्त केलेली एकूण बांधकामे
८ फेब्रुवारी – २२२
९ फेब्रुवारी – ६०७
१० फेब्रुवारी – ६८२
एकूण -१ हजार ५११
बांधकामांचे एकूण क्षेत्रफळ
८ फेब्रुवारी – १८ लाख ३६ हजार चौरस भूट
९ फेब्रुवारी – ६८ लाख ७८ हजार चौरस फूट
१० फेब्रुवारी – ३३ लाख ५८ हजार चौरस फूट
एकूण – १ कोटी २० लाख ७२ हजार चौरस फूट