पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १५७ जणांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. एकीकडे वाहतूक पोलीस आणि रस्ते, वाहतूक जनजागृती करणाऱ्या संस्था वारंवार हेल्मेट वापरण्याबाबत जनजागृती करतात. पण, हे दुचाकी चालकांच्या डोक्यात शिरत नाही हे वास्तव आहे. कायद्याने दुचाकी चालकांना हेल्मेट वापरणे बंधनकारक आहे. गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३८१ जणांचा अपघात झाला असून १५७ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
पिंपरी-चिंचवडच्या वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ३२ हजार ७५ जणांना १ कोटी ६० लाखांचा दंड आकारला आहे. अशी माहिती वाहतुक विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली आहे.
अनेक दुचाकी चालकांना हेल्मेट हे ओझं वाटतं म्हणून ते हेल्मेट वापरत नाहीत. पण, हेल्मेट हे किती महत्वाचं आहे हे अधोरेखित झालं आहे. पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या दहा महिन्यात विनाहेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या १५७ जणांचा अपघात होऊन मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात हेल्मेट वापरणाऱ्यांची केवळ पाच टक्के च संख्या आहे तर, उर्वरित ९५ टक्के दुचाकी चालक हेल्मेट वापरत नसल्याचं वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. हे चित्र बदलण्यासाठी वाहतूक पोलिसांना कंबर कसावी लागणार आहे. कठोर पाऊल उचलत कारवाई करण्याची देखील गरज आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आनंद भोईटे हे केवळ बुलेट चालकांवर लक्ष देण्यात मग्न आहेत का? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थितीत होतो आहे. कारण, त्यांनी फाडफाड आवाज करणाऱ्या बुलेट राजांवर कारवाई करत ४६ लाखांचा दंड वसूल केला आहे, हे कौतुकास्पद आहे. पण, विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर देखील कारवाई करत जरब बसणं तितकंच महत्त्वाचं आहे.
हेही वाचा- पुणे: ललित कला केंद्राची शनिवारी ‘ललित पौर्णिमा’; त्रिपुरारीनिमित्त रात्रभर कला सादरीकरण
“आम्ही विनाहेल्मेट दुचाकी चालकांवर कारवाई करत आहोत. जनजागृती देखील केली जाते आहे. गेल्या दहा महिन्यात तब्बल १ कोटी ६० लाखांचा दंड विना हेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांना आकारला आहे. कारवाई अधिक तीव्र करणार आहोत”, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिली.