पुणे : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा, एनसीसी, स्काऊट गाईड यासाठी दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या वाढीव गुणांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी १५ एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करण्याचा मानस असल्याचे राज्य मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य मंडळाच्या सचिव डॉ. माधुरी सावरकर यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना क्रीडा नैपुण्य, एनसीसी, स्काऊट गाईडसाठी सवलतीचे वाढीव गुण देण्यात येतात. त्यासाठी जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडून क्रीडा प्रस्ताव, तर एनसीसी, स्काऊट गाईड यासाठीचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडून दरवर्षी विभागीय मंडळाकडे ३० एप्रिलपर्यंत सादर केले जातात. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५मध्ये दहावी, बारावीच्या परीक्षा दरवर्षीच्या तुलनेत दहा दिवस आधी होत आहेत. तसेच या परीक्षांचा निकाल १५ मेपर्यंत जाहीर करणे मंडळाचा मानस आहे. त्यामुळे खेळाडू विद्यार्थ्यांचे प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी, तर एनसीसी, स्काऊट गाईडचे प्रस्ताव माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी विभागीय मंडळांकडे ऑनलाइन पद्धतीने १५ एप्रिलपर्यंत पाठवावयाचे आहेत. त्यामुळे या बाबतची नोंद घेऊन जिल्हा क्रीडा अधिकारी, सर्व माध्यमिक शिक्षणाधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक, विद्यार्थी, पालक या सर्व घटकांनी या बाबत व सर्व संबंधित घटकांनी उपरोक्त बाबींची नोंद घेऊन कार्यवाही करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader