पुणे : विमानप्रवास करणाऱ्या पुणेकरांची चेक इन प्रक्रिया अधिकाधिक जलद गतीने व्हावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने आणखी १६ चेक इन काऊंटर्स पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलवर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या माध्यमातून हे काम वेगाने होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : कुख्यात गुन्हेगार पिस्तूलासह जेरबंद, गुन्हे शाखेची कारवाई

केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, ‘नव्या चेक इन काऊंटरसह सध्याच्या जुन्या टर्मिनल इमारतीच्या आगमन कक्षाचा कायापालट करून त्याला नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीशी पुलाच्या माध्यमातून जोडण्यात येणार असून त्याचा विस्तारित प्रस्थान कक्ष म्हणून वापर करण्यात येईल. त्यासाठी उभारण्यात येत असलेल्या सुरक्षा तपासणी परिसरासाठी डीएफएमडी (डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर्स) व एक्स रे मशिन्स उपलब्ध करून देण्यात येत आहेत’

हेही वाचा >>> पुणे ग्रामीण पोलीस शिपाई पदाची लेखी परीक्षा शनिवारी

‘नव्या टर्मिनलशी एकात्मिक असणारी विमानतळ प्रणाली वापरण्याचा आणि खरेदी दालने उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी आणखी २५ कोटी रूपये खर्च अपेक्षित असून काम पूर्णत्वास गेल्यानंतर ४ हजार चौरस मीटर अतिरिक्त जागा वापरासाठी उपलब्ध होईल. मार्च २०२५पर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचेही मोहोळ यांनी सांगितले. पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल याच वर्षीच्या १४ जुलैपासून कार्यान्वित झाले आहे. या ठिकाणी सध्या ३४ चेक इन काऊंटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नव्या टर्मिलनची ‘पीक अवर’ क्षमता ३ हजार प्रवासी इतकी आहे. त्यात जुन्या टर्मिनलवर नवे १६ चेक इन काऊंटर उपलब्ध असल्याचे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 check in counters at the old terminal of pune airport says muralidhar mohol pune print news stj 05 zws