कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्यांची यादी वाढली आहे. निवडणुकीसाठी तब्बल १६ इच्छुकांनी मंगळवारी दूरचित्र संवाद (ऑनलाइन) पद्धतीने मुलाखती दिल्या. पोटनिवडणुकीसाठी इच्छुकांची संख्या वाढल्याने जोरदार चुरस निर्माण झाली असून उमेदवार कोण असणार, यासंदर्भात कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले हे येत्या चार फेब्रुवारीपर्यंत उमेदवाराच्या नावाची घोषणा करणार आहेत. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार. यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा >>> पुणे : नवले पुलाजवळ ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील सहप्रवासी महिलेचा मृत्यू
दरम्यान, काँग्रेसचे प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी नगरसेवक रविंद्र धंगेकर यांच्यात खरी चुरस असल्याचे दिसून येत आहे. शहर जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने काँग्रेस भवन येथे कसबा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या दूरचित्र संवाद पद्धतीने मंगळवारी मुलाखती घेण्यात आल्या. पोटनिवडणुकीसाठी प्रदेश काँग्रेसकडून आमदार संग्राम थोपटे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या.
इच्छुक उमेदवार
प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी, माजी महापौर कमल व्यवहारे, माजी नगरसेविका नीता रजपूत, शिक्षण मंडळाच्या माजी अध्यक्षा संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर या प्रमुख उमेदवारांबरोबरच विजय तिकोणे, आरिफ कांचवाला, संजय कांबळे, भोलेनाथ वांजळे, योगेश भोकरे, ऋषिकेश वीरकर, गौरव बाळंदे, अस्लम बागवान,शिवाजीराव आढाव यांनी मुलाखती दिल्या.