महावितरणच्या पुणे परिमंडलामध्ये गेल्या तीन महिन्यांपासून वीजबिल न भरणाऱ्या १६ हजार ४१३ घरगुती तसेच वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर, आणखी ७१ हजार ९८ थकबाकीदारांची वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे. वीजग्राहकांनी थकीत बिलांचा ताबडतोब भरणा न केल्यास वीजपुरवठा खंडित करण्याच्या नियमित कारवाईसोबतच ही धडक मोहीम महावितरणकडून सुरू आहे. यात पुणे शहरातील ६ हजार ५३६ ग्राहकांचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे :‘डीआरडीओ’चे संचालक कुरुलकर यांना १५ मेपर्यंत एटीएस कोठडीत ठेवण्याचे आदेश

पुणे परिमंडलामध्ये तीन महिन्यांपासून विजेचे एकही बिल न भरणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये पाचशे रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या ८७ हजार ५११ वीजग्राहकांनी तीन महिन्यांत एकही वीजबिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२ कोटी ६३ लाख रूपयांची थकबाकी असल्याचे निदर्शनास आले. ज्या ग्राहकांनी थकीत बिलांचा भरणा केला नाही त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याची विशेष मोहीम गेल्या एप्रिलपासून सुरु करण्यात आली आहे. यामध्ये १३ कोटी ३७ लाख रूपयांच्या थकबाकीपोटी आतापर्यंत १६ हजार ४१३ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तर, आणखी ७१ हजार ९८ ग्राहकांकडे २९ कोटी २८ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यांचाही वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.

हेही वाचा >>> पुर्नवसनाच्या मागणीसाठी पवना धरणग्रस्तांकडून पिंपरी चिंचवडकरांचे पाणी रोखण्याचे आंदोलन

पुणे शहरात अशा २६ हजार ७९६ ग्राहकांकडे ११ कोटी ८१ लाख रूपयांची थकबाकी आहे. त्यातील ६ हजार ५३६ ग्राहकांचा ४ कोटी ७१ लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर, उर्वरित २० हजार २६० ग्राहकांकडे थकीत ७ कोटी १२ लाख रुपयांची थकबाकी आहे. पिंपरी चिंचवड शहरात १६ हजार ३०० ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यांपासून १० कोटी ९१ लाख थकीत बिलांचा भरणा केलेला नाही. आतापर्यंत तीन हजार २०९ वीजग्राहकांचा ३ कोटी ५० लाखांच्या थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे तर आणखी १३ हजार ९१ ग्राहकांकडे ७ कोटी ४१ लाखांची थकबाकी आहे.

थकीत वीजबिलांचा ताबडतोब भरणा करून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन <a महावितरणकडून करण्यात आले आहे

सात तालुक्यांत २० कोटी थकबाकी

जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये ४४ हजार ४१५ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी १९ कोटी ९१ लाख रूपयांच्या थकीत बिलांचा भरणा केला नाही. त्यातील ६ हजार ६६९ ग्राहकांचा वीजपुरवठा ५ कोटी १६ लाखांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तर, उर्वरित ३७ हजार ७४७ वीजग्राहकांकडे १४ कोटी ७५ लाखांची थकबाकी आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 16 thousand power connection disconnected over non payment of bill pune print news vvk 10 zws