पुणे : लष्कर, केंद्र आणि राज्य सशस्त्र सेवेतील जवानांबरोबरच प्रशिक्षण किंवा शासकीय सेवेनिमित्त परदेशात कार्यरत असलेल्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना कसबा, चिंचवड विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतपत्रिका दिल्या आहेत. या दोन्ही मतदारसंघांतील मिळून २०६ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना या नव्या सुविधेचा फायदा होणार आहे.
लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात एक लाख आठ हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्स मतदारांची नोंद झाली होती. कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी अनुक्रमे ३८ आणि १६८ मतदारांची नोंद झाली आहे. त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतपत्रिका पोहोचवल्या गेल्या आहेत.
हेही वाचा >>> पुणे : कसबा, चिंचवडमध्ये छुप्या प्रचारावर प्रशासनाचा ‘वाॅच’
मतदानाच्या आधी दहा दिवस सर्व्हिस वोटर्स मतदारांना ईटीपीबीएस यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठवल्या आहेत. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने टपालाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण या सुविधेमुळे कमी झाला आहे. या मतपत्रिका डाऊनलोड करून त्याची प्रत काढून त्या मतपत्रिकेवर आपले मत नोंदवल्यानंतर विहित पद्धतीने ती टपालाने पाठवणे आवश्यक आहे. टपाल मते पाठवण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नाही. ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता आहे. इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी (वन टाइम पासवर्ड) आणि पिन क्रमांक आवश्यक आहे. युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल होणे अशक्य आहे.
हेही वाचा >>> मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली
पात्र कोण
सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान, केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान, निवडणूक काळात राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलांमधील जवान, जवानाबरोबर निवास करत असलेली पत्नी, परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी (ओव्हरसीज वोटर्स) हेच या सुविधेसाठी पात्र ठरतात.
ईटीपीबीएस कसे काम करेल?
केंद्रीय निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने ईटीपीबीएस यंत्रणा विकसित केली आहे. सन २०१६ मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा या यंत्रणेचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइन पद्धतीने सरकारी सेवा बजावणाऱ्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले किंवा अन्य शासकीय सेवांमधील समन्वयक अधिकारी सरकारी सेवा बजावणाऱ्या मतदारांसाठी ईटीपीबीएसचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे पाठवतात. या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सरकारी सेवा बजावणाऱ्या मतदारांची यादी संबंधित मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे पाठवल्यानंतर हे अधिकारी या अर्जावर निर्णय घेतात.