पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत आतापर्यंत ९ हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात १७ कोटी ४ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. या योजनेसाठी महापालिकेकडे यंदाच्या वर्षी १३ हजार ८५४ अर्ज प्राप्त झाले होते. त्यांची छाननी करून १० हजार ८३१ लाभार्थी पात्र ठरले आहेत.
पुणे महापालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या आणि दहावी, बारावीची परीक्षा ८० ते ८५ टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महापालिकेच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेंतर्गत दहावीतील विद्यार्थ्यांसाठी, तर बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे शैक्षणिक अर्थसाहाय्य योजनेच्या माध्यमातून मदत दिली जाते. दहावीच्या विद्यार्थ्यांना १५ हजार, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपये दिले जातात.
मागील वर्षी या योजनेचा फायदा ९ हजार ७०५ लाभार्थ्यांनी घेतला होता. यंदाच्या वर्षी त्यामध्ये वाढ होऊन ही संख्या १० हजार ८३१ इतकी झाली आहे. या योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये अर्थसाहाय्य योजनेची रक्कम जमा केली जाते. आतापर्यंत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये १७ कोटी ४ लाख ३० हजार रुपये जमा करण्यात आले आहेत, अशी माहिती समाजविकास विभागाचे उपायुक्त नितीन उदास यांनी दिली.
उपायुक्त उदास म्हणाले, दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी अर्थसाहाय्य देण्यासाठी महापालिकेने ही योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत महापालिकेने पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. यासाठी ३० सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला होता. मात्र, हा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला होता.
या कालावधीत या दोन्ही योजनांसाठी महापालिकेकडे १३ हजार ८५४ अर्ज महापालिकेकडे प्राप्त झाले होते. त्यांची छाननी केल्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने तसेच अटींमध्ये बसत नसल्याने २ हजार १७९ अर्ज बाद झाले. उर्वरित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये या योजनेची रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असेही उदास यांनी स्पष्ट केले.
समाज कल्याण विभागाचे उपायुक्त उदास म्हणाले, दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीची रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत ९ हजार ७९४ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये १७ कोटी ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पुढील आठवड्यातच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा होईल.