चिंचवडच्या ऋषी पाठक या विद्यार्थ्यांची कामगिरी
आताची पिढी समाजमाध्यमांत व्यग्र असते, हल्लीचे विद्यार्थी-तरुण वाचत नाहीत, अशी ओरड एकीकडे केली जात असताना चिंचवडच्या ऋषी पाठक या विद्यार्थ्यांच्या नावावर सतराव्या वर्षीच तीन पुस्तके आहेत. त्याचे आतापर्यंत इंग्रजीतील दोन लघुकथा संग्रह आणि एक कादंबरी प्रकाशित झाली आहे.
ऋषी सध्या चिंचवडमध्ये एका खासगी शाळेत शिकतो. मात्र, त्याला वाचनाची आणि लिहिण्याची लहानपणापासूनच आवड आहे. त्याच्या आजोबांनाही लिहिण्यात रस होता. त्यांनी दोन कादंबऱ्या लिहिल्या होत्या. आजोबांव्यतिरिक्त घरात अन्य कोणीही लेखन केलेले नाही. बहुतेकांचे शिक्षण अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित आहे. ऋषीलाही भौतिकशास्त्रात रस आहे. मात्र, त्याच वेळी तो आपली वाचन, लेखनाची आवडही उत्साहाने जपत आहे. त्यातूनच २०१५ मध्ये त्याने ‘मिलियन डॉलर सोव्हरगिन’ आणि ‘रिटर्न ऑफ द फँटम ऑफ द ऑपेरा’ हे दोन लघु कथासंग्रह प्रकाशित केले. हे दोन्ही संग्रह अॅमेझॉनवर उपलब्ध आहेत. तर नुकतीच त्याची ‘जस्टिस ब्लाइंड नो मोअर’ ही कादंबरीही प्रकाशित झाली.
ऋषीने आजपर्यंत इंग्रजीतील क्लासिक मानली जाणारी पुस्तके वाचली आहेत. मात्र, त्याने इंग्रजीतून लेखन करणाऱ्या भारतीय लेखकांची पुस्तके वाचलेली नाहीत. मात्र, इंग्रजी लेखकांमध्ये त्याला डॅन ब्राऊन, जेफ्री आर्चर हे लेखक विशेष आवडतात. ऋषीची नवी कादंबरी चेन्नई आणि दिल्लीतील पुस्तक जत्रेमध्ये सहभागी होणार आहे. त्याला लेखनाप्रमाणेच संगणक प्रोग्रॅमिंगमध्येही रस आहे.‘मी लेखनाकडे कसा वळलो, याचे नेमके कारण सांगता येणार नाही. मला वाचण्यात रस होताच, त्याच वेळी आपणही काहीतरी लिहावे असे वाटू लागले. म्हणून लिहिण्यास सुरुवात केली. वयाच्या आठव्या वर्षांपासून मी लिहू लागलो. २०१५ मध्ये दोन कथासंग्रह प्रकाशित केले. नुकतीच कादंबरीही प्रकाशित झाली आहे. पूर्ण वेळ लेखक म्हणून करिअर करण्याचा विचार नाही, असे सांगतो.
वाचन उपयुक्तच..
आजची पिढी वाचत नाही, या टीकेत काही प्रमाणात तथ्यही आहे. कारण, वाचणाऱ्यांचे प्रमाण अन्य कामात वेळ घालवणाऱ्यांपेक्षा कमी आहे. पण वाचले पाहिजे हेही तितकेच खरे आहे. वाचनाने आपला शब्दसंग्रह संपन्न होतो. आपल्या कल्पनाशक्तीला चालना मिळते. काही प्रमाणात अभ्यासातही उपयोग होतो. कारण, अवांतर वाचनामुळे विकसित झालेला वेग अभ्यासातही उपयुक्त ठरतो, असे ऋषी सांगतो.