चिन्मय पाटणकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : राजापुरातील बारसू येथील सडय़ावर मोठय़ा प्रमाणात कातळशिल्पे आहेत. त्यामुळे बारसूमध्येच तेलशुद्धीकरण प्रकल्प उभारल्यास सुमारे १७० कातळशिल्पे धोक्यात येणार असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रागैतिहासिक काळापासूनची संस्कृती दर्शवणाऱ्या गूढ कातळशिल्पांच्या जतन-संवर्धनाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

बारसू गावातील कातळशिल्पासह एकूण आठ ठिकाणची कातळशिल्पे ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे कातळशिल्पांच्या जतन आणि संवर्धनाची आशा निर्माण झाली. मात्र, आता प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पामुळे बारसूच्या सडय़ावरील सुमारे १७० कातळशिल्पे धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.

बारसू येथील कातळशिल्पांबाबत माहिती घेण्यासाठी ‘लोकसत्ता’ने रत्नागिरी येथील ज्येष्ठ अभ्यासक सुधीर रिसबूड यांच्याशी संपर्क साधला. ‘‘रिफायनरी प्रकल्प एकूण सहा गावांच्या सडय़ावर होणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यात बारसू, सोलगाव, देवाचे गोठणे, सोगमवाडी, गोवळ, शिवणे यांचा समावेश आहे. या गावांच्या सडय़ाच्या भागाला ‘राजापूर लॅटिरॅटिक सरफेस’ म्हटले जाते. या परिसरात असलेल्या कातळशिल्पांबाबत गेली दहा वर्षे काम सुरू आहे. त्यामुळे या भागाचा अभ्यास केला असता, आतापर्यंत सुमारे १७० कातळशिल्पे आढळून आली आहेत. त्यातील देवाचे गोठणे या गावातील कातळशिल्प वगळल्यास अन्य गावांतील कातळशिल्पे रिफायनरीच्या प्रस्तावित जागेत येत असल्याचे दिसून येते. देवाचे गोठणे येथील कातळशिल्प ‘युनेस्को’च्या तात्पुरत्या यादीतही आहे. रिफायनरी प्रकल्पामुळे धोक्यात येणाऱ्या सुमारे १७० कातळशिल्पांमध्ये युनेस्कोच्या यादीतील बारसू येथील कातळशिल्पांचा समावेश आहे. कातळशिल्पांचा अभ्यास केला असता तो परिसर तत्कालीन मानवासाठी महत्त्वाचा होता. त्यामुळे तो कालखंड समजून घेण्यासाठी कातळशिल्पे महत्त्वाची आहेत. तसेच सडय़ावरील दगड सच्छिद्र असल्याने पावसाचे पाणी भूगर्भात जाऊन विहिरींच्या माध्यमातून ते उपलब्ध होते. त्यामुळे हा सडा पाण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचा आहे,’’ अशी माहिती रिसबूड यांनी दिली.

कातळशिल्पांप्रमाणेच या सडा परिसरात अनेक दुर्मीळ वनस्पती आणि जैवविविधता आहे. त्यातील काही वनस्पती तर ‘एंडेमिक’ (केवळ राजापूर परिसरात आढळणाऱ्या) आहेत. त्यामुळे या जैवविविधतेवरही घाला येण्याची शक्यता असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.   बारसूच्या सडय़ावर नेमकी किती कातळशिल्पे आहेत, याचे अद्याप सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्प झाल्यास किती कातळशिल्पे त्यात जातील, याबाबत आताच काही बोलणे योग्य ठरणार नाही. – डॉ. तेजस गर्गे, संचालक, राज्य पुरातत्त्व विभाग

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 petroglyphs in konkan at risk if oil refinery project set up in barsu zws