पुणे : फटाक्यांसारखा आवाज काढणारे कर्कश सायलेन्सरचा वापर करणाऱ्या बुलेटचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाहतूक पोलिसांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करुन फटाक्यासारखे आवाज काढणारे सायलेन्सर जप्त केले. येरवड्यातील वाहतूक शाखेच्या कार्यालयात जप्त केलेल्या एक हजार ७६८ सायलेन्सरवर बुलडोझर चालविण्यात आला. पोलिसांच्या कारवाईचे नागरिकांनी कौतूक केले आहे.

रात्री अपरात्री शहर,तसेच उपनगरात भरधाव वेगाने बुलेटचालक तरूण जातात. बूलेटच्या सायलेन्सरमध्ये फेरफार (माॅडिफाय) करण्यात आल्याने त्यातून फटाक्यासारखा आवाज निघतो. फटाक्यासारख्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून पोलिसंनी शहरातील वेगवेगळ्या भागात बुलेटचालकांविरुद्ध कारवाई करुन त्यांचे सायलेन्सर जप्त केले होते. कर्कश सायलेन्सर नष्ट करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिले होते.

त्यानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या एक हजार ७६८ सायलेन्सरवर ‘बुलडोझर’ चालवून नष्ट केले. या वेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक सुनील गवळी आणि वाहतूक शाखेतील अधिकारी उपस्थित होते. फटाक्यासारखा आवाज काढणारे, तसेच चित्रविचित्र आवाज काढणारे सायलेन्सर बसविल्यिास पोलिसांकडून जप्त करण्यात येणार आहे. अशा प्रकारच्या सायलेन्सरचा वापर करणाऱ्या दुचाकीस्वार, बुलेटचालकांविरुद्ध यापुढील काळात तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस उपायुक्त अमोल झेडे यांनी दिला आहे.

विक्रेते, गॅरेजचालकांविरुद्ध कारवाई

कर्कश सायलेन्सरचा वापर करणारे वाहनचालक, तसेच सायलेन्सर विक्री करणारे व्यावसायिक, तसेच सायलेन्सर बसवून देणारे गॅरेजचालकांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. यापुढील काळात ही कारवाई तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा वाहतूक शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिला आहे.

Story img Loader