पुणे : घर अथवा सदनिका खरेदीसाठी नागरिक आयुष्यभराची पुंजी लावून आणि बँकेतून कर्ज घेऊन पैसे उभारतात. हे पैसे विकासकाला देऊनही त्यांना घर मिळत नाही. अशा ग्राहकांनी महारेराकडे दाद मागितल्यानंतर त्यांचे पैसे परत देण्याचा आदेश विकासकांना देण्यात आला होता. पुण्यातील काही विकासकांकडे ग्राहकांचे तब्बल १७७ कोटी रुपये अडकले आहेत. ते वसूल करण्यासाठी महारेराने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाकडे (महारेरा) अनेक ग्राहक विकासकांच्या विरोधात दाद मागतात. यात महारेराकडून ग्राहकांच्या बाजूने निकाल देऊनही त्यांचे विकासकांकडे अडकलेले पैसे मिळत नाहीत. त्यामुळे कायदेशीर न्याय मिळाला, तरी हातात आपले पैसे न पडल्याने या ग्राहकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळत नाही. महारेराकडून अशा विकासकांकडून वसुलीचे वॉरंट जिल्हा प्रशासनाला पाठविण्यात येतात. त्यावर कार्यवाही करावी, यासाठी महारेराचे प्रमुख मनोज सौनिक यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र लिहिले आहे.
महारेराच्या पत्रात म्हटले आहे, की तुमच्या जिल्ह्याकडे अनेक विकासकांच्या वसुलीची वॉरंट पाठविण्यात आली आहेत. सामान्य नागरिकांनी एखादे घर अथवा सदनिका खरेदी करण्यासाठी बँकेचे कर्ज काढून, आयुष्यभराची गुंतवणूक लावलेली असते. त्यांचे घर खरेदीचे स्वप्न विकासक पूर्ण करीत नाहीत आणि त्यांचे पैसेही परत देत नाहीत. महारेराने अशा प्रकरणांमध्ये ग्राहकांच्या बाजूने निर्णय दिला आहे. जिल्हाधिकारी या नात्याने कायदेशीर उपाययोजना करून ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत.
पुण्यातील मारवेल ग्रुप अँड डेव्हलपर्स, एक्सर्बिया चाकण डेव्हलपर्स आणि डी. एस. कुलकर्णी या तीन विकासकांकडे ग्राहकांचे ९६ कोटी रुपये अडकले आहेत. पुणे जिल्ह्यातील एकूण प्रलंबित वसुलीपैकी ही रक्कम ५४ टक्के आहे. त्यामुळे या विकासकांवर कार्यवाही करून त्यांच्याकडून पैसे वसूल करावेत. विकासकांकडूल वसुलीबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची विनंती आहे. याचबरोबर वसुली प्रगतीचा मासिक अहवाल दरमहा पाठविण्याच्या सूचना संबंधितांना कराव्यात, असेही महारेराने पत्रात नमूद केले आहे.
विकासकांकडे किती पैसे अडकले?
- मारवेल ग्रुप अँड डेव्हलपर्स – ६७ कोटी रुपये
- एक्सर्बिया चाकण डेव्हलपर्स – १०.६१ कोटी रुपये
- डी. एस. कुलकर्णी – १८.३१ कोटी रुपये
गृह खरेदीदारांची कोंडी
- तक्रारी – २७४
- प्रकल्प – १४०
- ग्राहकांची अडकलेली रक्कम – १७७.५० कोटी रुपये
आतापर्यंत ग्राहकांना ४२ कोटी मिळाले
आतापर्यंत पुणे जिल्ह्यात ६२ ग्राहकांना त्यांचे पैसे परत मिळाले आहेत. या ग्राहकांनी ३७ प्रकल्पांच्या विरोधात महारेराकडे तक्रारी केल्या होत्या. त्यांना विकासकांकडून ४२.३१ कोटी रुपये परत मिळाले आहेत. याच वेळी अनेक ग्राहक अद्यापही विकासकांकडून पैसे मिळण्याची प्रतीक्षा करीत आहेत. महारेराने आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिल्याने ग्राहकांना त्यांचे पैसे जलद मिळतील, अशी आशा निर्माण झाली आहे.