पुणे : सदाशिव पेठेतील एका सोसायटीतील दोन सदनिकांमधून चोरट्यांनी १८ लाख १२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.याबत दीपक ज्ञानेंद्र शहा (वय ४३) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदाशिव पेठेतील नातूबाग परिसरात असलेल्या रघुवीर सोसायटीत शहा राहायला आहेत. शहा यांच्या सदनिकेचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी कपाटातील सोन्याचे दागिने आणि रोकड असा १७ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याच सोसायटीतील रहिवासी जयंत बाळासाहेब कुलकर्णी (वय४३) यांच्या सदनिकेतून रोकड आणि सोन्याचे दागिने असा २७ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे शहा यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. शहा आणि कुलकर्णी यांच्या सदनिकेत चोरी करणारा चोरटा माहितगार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
कोथरुडमध्ये भरदिवसा घरफोडी
कोथरुड भागात भरदिवसा एका सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत हितेश प्रभाकर दळवी (वय ३२, रा. कोथरूड गावठाण) यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दळवी हे भुजबळ आळीतील एका सोसायटीतील सदनिकेत राहायला आहेत. दळवी कुटुंबीय रविवारी (१८ ऑगस्ट) सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाटातून दागिने आणि रोकड असा एक लाख दोन हजार रुपयांचा ऐवज चोरून चोरटे पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक सानप तपास करत आहेत.