अनुराधा मस्कारनेस

करोना विषाणूच्या ओमायक्रॉन या प्रकारातून उत्परिवर्तित एक्सबीबी या उपप्रकाराने बाधित १८ रुग्ण राज्यभरात आढळले आहेत. त्यापैकी १३ रुग्ण पुण्यातील असल्याचे समोर आले आहे. संबंधित रुग्णांना झालेला संसर्ग सौम्य स्वरूपाचा असल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा >>>अखेर भाजपला उपरती ; पुण्याच्या अवस्थेची जबाबदारी स्वीकारली ; चंद्रकांत पाटील यांच्याकडून पुणेकरांची दिलगिरी

करोना बाधित रुग्णांच्या जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन्साकॉग या प्रयोगशाळा महासंघाच्या अहवालानुसार ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात एक्सबीबी या उपप्रकाराने बाधित १८ रुग्ण राज्यभरात आढळले. तर बीक्यू.१ आणि बीए२.३.२० या उपप्रकाराचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला. २४ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळातील हे रुग्ण आहेत. तसेच ओमायक्रॉनच्या बीए.२.७५ आणि बीजे.१ या उपप्रकारातून उत्परिवर्तित एक्सबीबी या उपप्रकाराचे एकूण १८ रुग्ण राज्यभर आढळले. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार या रुग्णांपैकी १३ रुग्ण पुण्यातील आहेत. तर प्रत्येकी दोन नागपूर, ठाणे येथील आणि एक रुग्ण अकोला येथील आहे. या रुग्णांना ओमायक्रॉनच्या संसर्गासारखीच सौम्य लक्षणे होती.

हेही वाचा >>>पुणे : पावसाच्या दणक्यानंतर आता वाहन विम्यासाठी धावाधाव

सर्व रुग्णांना सौम्य लक्षणे होती, कुणालाही रुग्णालयात दाखल करावे लागले नसल्याची माहिती पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले. तर रुग्णसंख्या कमी असून, लक्षणे समजून घेण्यासाठी अधिक विदा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी सांगितले. या संदर्भात वैद्यकीय अभ्यास करून त्या बाबतचा अहवाल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला सादर करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.सध्या राज्यात २ हजार ६८८ सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात ४१८ नवे रुग्ण आढळून आले. आतापर्यंत राज्यात ८१ लाख २८ हजार ६७६ रुग्णांची नोंद झाली आहे. बुधवारी मुंबई विभागात २४४, पुणे विभागात १०५ नव्या रुग्णांची नोंद झाली.

Story img Loader