प्ले ग्रुप, नर्सरीच्या पाठोपाठ आता ‘नर्सरीपूर्व’ची टूम; मुलांना ‘शाळासवय’ लावण्याच्या नावाखाली व्यवसाय जोरात
‘प्ले ग्रुप’ किंवा ‘नर्सरी’ अशा नावाखाली बक्कळ शुल्क आकारून चालवण्यात येणाऱ्या शाळांना चाप लावण्यासाठी मुलाने वयाची तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश देण्याचा नियम शासनाने केला असला तरी, आकर्षक नावांनी चौकाचौकांत चालवण्यात येणाऱ्या खासगी पूर्वप्राथमिक शाळांची धाव मात्र उलटय़ा दिशेने सुरू आहे. पुण्यातील अशा बहुतांश शाळांमध्ये वयाच्या दुसऱ्या वर्षांतच मुलांना शाळेत दाखल करून घेतले जात आहे. त्यातच आता ‘नर्सरी’ची सवय लागावी म्हणून वयाच्या १८व्या महिन्यापासूनच मुलांना शाळेकडे खेचून आणण्यासाठी अशा शाळांनी ‘नर्सरीपूर्व’ वर्ग चालवण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, यावर शासनाचे अजिबात नियंत्रण नसल्याने मनमानी शुल्क आकारणी करून अशा शाळा आपला गल्ला भरत आहेत.
पूर्वप्राथमिक शाळांच्या बाजारपेठेवर शिक्षण विभागाला नियंत्रण आणणे अजूनही शक्य झालेले नाही. त्याबाबतचे विविध अहवाल गेल्या तीन वर्षांपासून धूळ खात पडले आहेत. प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेताना वयाच्या निकषांमध्ये असलेल्या फरकामुळे गोंधळ होऊ लागला. त्यासाठी गेल्या वर्षी शिक्षण विभागाने शाळेतील प्रवेशासाठी वयाचे निकष निश्चित केले. त्यानुसार वयाची तीन वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांलाच नर्सरीमध्ये प्रवेश द्यावा, असे आदेश शासनाने दिले. परंतु, गेल्या वर्षीच्या या आदेशाला शाळांनी यंदाच्या वर्षीही हरताळ फासला आहे. बहुसंख्य शाळांत अडीच वर्षांच्या मुलांनाच प्रवेश देण्यात आले आहेत. स्थानिक शिक्षणसंस्थांशी संलग्न असलेल्या शाळा वगळता इतर बहुतेक सर्व खासगी शाळांनी प्रवेशाच्या वयाचा निकष धाब्यावर बसवला आहे. आता खासगी नर्सरी शाळांनी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता ‘नर्सरीपूर्व’ शाळा सुरू करण्यात आल्या असून त्यात चक्क दीड ते अडीच वर्षांच्या मुलांना प्रवेश देण्यात येत आहे.
‘शाळा’ या संकल्पनेची ओळख व्हावी यासाठी बालवर्ग किंवा केजीपूर्वी नर्सरी हा टप्पा सुरू झाला. मात्र काही काळातच नर्सरी हा शिक्षणाचा पहिला टप्पा मानण्यात येऊ लागला. त्यामुळे आता मुलांना ‘नर्सरी’ची ओळख व्हावी, म्हणून ‘नर्सरीपूर्व’ वर्ग सुरू करण्याची टुम निघाली आहे.
दोन ते तीन तासांच्या या वर्गात मुलांना चित्रांची ओळख, चित्र रंगवणे, आकारांची ओळख असा अभ्यासक्रम शिकवण्यात येतो. मात्र, त्यामुळे वयाच्या १८व्या महिन्यांतच मुलांवर दप्तर सावरत शाळेत जाण्याची पाळी आली आहे.

‘नर्सरीपूर्व’ वर्ग चालवण्यात पुण्यातील ब्रॅण्डेड नर्सरी शाळा आघाडीवर आहेत. देशात नर्सरी शाळांचे साधारण १५० ते २०० ब्रॅण्ड्स असल्याची माहिती विविध संकेतस्थळे आणि अहवालांवरून मिळते आहे. शाळा प्रवेशाची माहिती देणारी संकेतस्थळे, विविध अहवाल यांनुसार पुण्यात सध्या नर्सरी शाळांचे ९५ ते १०० ब्रॅण्ड्स आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय तर काही राज्य स्तरावर विस्तार असलेले ब्रॅण्डस आहेत. या प्रत्येक ब्रॅण्डच्या किमान १० ते १५ शाखा आहेत. याशिवाय घरोघरी सुरू झालेल्या शाळांची गणतीच नाही.
तीन वर्षांखालील विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणे हे कायद्याचे उल्लंघन आहे. याबाबत शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात येतील. मात्र, यापेक्षाही पालकांचे प्रबोधन करणेही गरजेचे आहे.’’
– गोविंद नांदेडे, शिक्षण संचालक (प्राथमिक)

नियम केला पण अंमलबजावणीचा अधिकार नाही
शासनाने शाळा प्रवेशासाठी वयाचे निकष ठरवून दिले. त्या निकषांप्रमाणेच शाळांनी प्रवेश द्यावेत असा नियमही केला. मात्र, या नियमाची अंमलबजावणी करण्याचे अधिकार शासनालाच नाहीत. पूर्व प्राथमिक शिक्षण हे शिक्षण विभागाच्या अखत्यारीत येतच नसल्यामुळे नियम मोडणाऱ्या शाळांकडे काणाडोळा करण्यापलीकडे शिक्षण विभागाला दुसरा पर्यायच राहिलेला नाही. खासगी नर्सरी शाळा या ‘शाळा’ म्हणून नोंदवल्याच जात नसल्यामुळे नियमाचा बडगा दाखवून या शाळांवर काहीच कारवाई करता येत नाही.
प्रातिनिधिक छायाचित्र

Story img Loader