लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी: दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयातील १७० गुणवंत विद्यार्थ्यांना आणि १२ दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत १९ विद्यार्थी एक लाखाच्या बक्षिसाचे मानकरी ठरले आहेत.
या विद्यार्थ्यांच्या बक्षिसांपोटी महापालिका चार कोटी रुपये खर्च करणार आहे. महापालिकेच्या १८ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमधून १ हजार ७८० विद्यार्थी परीक्षेला बसले होते. दहावीच्या परीक्षेत ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना महापालिकेमार्फत रोख रकमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येते. सन २००८ पासून ही योजना महापालिकेतर्फे राबविण्यात येत आहे. सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून या योजनेत व धोरणात बदल करण्यात आला.
आणखी वाचा-पुणे लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा तयारी? घेतला ‘हा’ निर्णय
त्यानुसार, महापालिकेच्या १८ माध्यमिक विद्यालयांतील ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेणाऱ्या १९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. ८५ ते ८९.९९ टक्क्यांपर्यंत गुण मिळविणाऱ्या ५९ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार, तर ८० ते ८४.९९ टक्के गुण मिळविणाऱ्या ८० विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये बक्षीस मिळणार आहे. ३५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या आणि ४० टक्के अपंगत्व असलेल्या १२ दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.