पुणे: पुण्यातील बाणेर येथे गुरुवारी १९ वर्षीय तरुणाने मद्यपान करून तीन ते चार वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर या प्रकरणातील आरोपी (ऋतिक शाम बनसोडे, वय १९) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाणेर येथील सर्व्हिस रोडवर आरोपी ऋतिक शाम बनसोडे या १९ वर्षीय तरुणाने मद्यपान करून त्याच्या ताब्यातील चार चाकी वाहनाने तीन ते चार वाहनांना धडक दिली.त्यावेळी घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी आरोपी चालकाला वाहन थांबविण्याची विनंती केली.पण आरोपीने ती गाडी न थांबवता पुढे घेऊन जाऊ लागल्यावर काही तरुणांनी त्याच्या गाडीवर दगड देखील फेकले,जेणेकरून तो गाडी थांबवेल,पण तो गाडी पुढेच घेऊन गेला.अखेर काही तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करून आरोपी ऋतिक शाम बनसोडे याला पोलिसांच्या ताब्यात दिले.या आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक चौकशी करण्यात येत आहे.
© The Indian Express (P) Ltd