इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरचे माजी संचालक आणि केंद्रीय वैज्ञानिक सल्लागार परिषदेचे सदस्य संजय गोविंद धांडे (वय ५८, रा. पाषाण) यांची इंटरनेट बँकिंगद्वारे १९ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर शाखेच्या पोलिसांनी मुंबई येथून दोघांना अटक केली आहे. धांडे यांच्या खात्यावरून मुंबई, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान येथील बँकेच्या अकरा खात्यांवर पैसे हस्तांतरित करण्यात आल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींना २० नोव्हेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.
पंकज घेवरचंद जैन (वय ३१) आणि सलीम हनीफ मेमन (वय ३१, रा. मुंबई) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. यातील एक जण व्यावसायिक, तर दुसरा मोटारींची विक्री करतो. या दोघांच्या खात्यावर यातील काही रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. या गुन्ह्य़ात पूर्वी विनायक महादेव तिरलोटकर (वय २५, रा. लोअर परळ, मुंबई)यास अटक केली आहे. आरोपी तिरलोटकर हा एका खासगी कंपनीत कामाला असून त्याच्या नावाने मुख्य आरोपींनी मुंबईतील फोर्ट भागातील आयसीआयसीआय बँकेत तीन खाती उघडली आहेत. त्या खात्यावर धांडे यांच्या खात्यातून एक लाख रुपये हस्तांतर करण्यात आले होते. त्या बदल्यात तिरलोटकर याला तीन टक्के कमिशन देण्यात आले आहे. त्यातील एक खाते तिरलोटकर स्वत: वापरत असल्याची माहिती मिळताच सायबर शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली होती. धांडे यांच्या खात्यावरून तीन राज्यांतील एकूण ११ खात्यांवर पैसे हस्तांतरित झाले असून ते १२ वेळा काढून घेण्यात आले, अशी माहिती तपासात समोर आली आहे. औंध रस्त्यावरील आयसीआयसीआय बँकेत धांडे यांचे खाते असून ६ आणि ७ सप्टेंबर रोजी त्यांच्या खात्यावरील १९ लाख दहा हजार रुपये इंटरनेट बँकिंगद्वारे काढण्यात आले होते. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बाबर तपास करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा