पुणे : आजारपणाचा फायदा घेत सहा जणांनी निवृत्त मुख्याध्यापिकेची धायरी येथील जमीन कमी किमतीत विकून दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. आरोपींनी महिलेला धमकावून दहा लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी सहा जणांविरुद्ध फसवणूक, तसेच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एका निवृत्त मुख्याध्यपिकेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी ॲड. रवी सुरेश जाधव (रा. गल्ली क्रमांक पाच, कोरेगाव पार्क), चंद्रकांत गजानन पोकळे, चिंतामणी अंकुश पोकळे (दोघे रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, धायरी), तरुणराज संजीव कुसाळकर, करण संजीव कुसाळकर (दोघे रा. गुलमोहर पार्क, औंध) आणि अभिजित (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सॅलिसबरी पार्क परिसरात राहायला आहेत. त्या शहरातील एका नामवंत शाळेत मुख्याध्यापिका होत्या. आरोपी ॲड. रवी जाधव याच्याशी त्यांची खटल्याच्या कामाकाजानिमित्त ओळख झाली होती. ॲड. जाधवने साथीदारांशी संगनमत केले. महिलेचे वृद्धत्व आणि आजारपणाचा गैरफायदा घेतला. महिलेच्या धायरी येथील जमिनीची किंमत कमी असल्याचे भासवून दिशाभूल केली. धायरीतील जमिनीची किंमत तीन कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. आरोपींनी ज्येष्ठ महिलेला संबंधित जमिनीची केवळ एक कोटी रुपयांत विक्री करण्यास भाग पाडले.
हेही वाचा…धक्कादायक : मराठा आरक्षणासाठी पुण्यातील तरुणाची आत्महत्या
आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठ महिलेची दोन कोटी रुपयांची फसवणूक केली. तसेच रवी जाधव आणि अभिजित यांनी २३ नोव्हेंबर २०२३ रोजी महिलेला घराजवळ असलेल्या स्वीस कॅफेत बोलवून घेतले. ज्येष्ठ महिला दोघांना भेटण्यासाठी गेली, तेव्हा आरोपींनी त्यांना दहा लाख रुपये खंडणी मागितली, असे ज्येष्ठ महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करत आहेत.