पिंपरी : रिक्षा उलटून झालेल्या अपघातात चालकासह दोघांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना ३१ जानेवारी रोजी रात्री दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील मरकळ येथे घडली. सुनील बालाजी सगर (वय १९, रा. निगडी), रोहन भाऊसाहेब गाडे (वय २२, रा. निगडी) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, १६ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर चिंचवड येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हेही वाचा >>> मद्यपींची पोलिसांना धक्काबुक्की; तिघे अटकेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीलची बहीण भीमा कोरेगाव येथे राहते. तिने निगडी येथून काही साहित्य मागवले होते. ते साहित्य पोहोचवण्यासाठी सुनील याने १६ वर्षीय तरुणाला सोबत घेतले. दोघेजण रोहनच्या रिक्षातून भीमा कोरेगाव येथे जात होते. मरकळ येथे रिक्षाचा दुचाकीला धक्का बसल्याने रोहन याचे रिक्षावरील नियंत्रण सुटले. रिक्षा रस्त्याच्या बाजूला उलटली. या अपघातात रोहनचा जागेवरच मृत्यू झाला. १६ वर्षीय युवक आणि सुनील सगर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान सुनीलचा मृत्यू झाला आहे.