राज्यात पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राज्य परीक्षा परिषदेतर्फे अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केली आहे.
राज्यात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची मागणी राज्यभरातील उमेदवारांकडून करण्यात येत होती. त्यामुळे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शासनातील विविध विभागातील रिक्त पदांवर मेगा भरतीची घोषणा करण्यात आली. त्यात शिक्षकांच्या पदांचाही समावेश आहे. शिक्षकांच्या भरती प्रक्रियेसाठी अभियोग्यता आणि बुद्धिंमापन चाचणी घेतली जाणार आहे. २०१७मध्ये झालेल्या अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीनंतर गेल्या पाच वर्षांत ही परीक्षाच झालेली नाही. या पार्श्वभूमीवर २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणी परीक्षा परिषदेतर्फे ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. या परीक्षेसासाठी नोंदणी करण्याची मुदत रविवारी संपली.
अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी राज्यभरातून सुमारे २ लाख ४० हजार उमेदवारांनी नोंदणी केल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांनी दिली.