दुकानांमधून ‘मॅगी’ गायब झाली, पाकीटबंद पदार्थाबद्दलची शंकाही वाढू लागली आणि घराघरांत, कँटीन-कट्टय़ांवर एकच प्रश्न सतावू लागला, आता ‘२ मिनिटांत काय’..! चाणाक्ष गृहिणींनी या मधल्या वेळच्या ‘झटपट’ तयार होणाऱ्या खाण्यावर पर्याय शोधायला सुरुवात केली. वसतिगृहांच्या एकमेव खोलीत जवळच्या एकमेव भांडय़ात आता कोणता पदार्थ करता येणार यावर चर्चा झडू लागल्या आणि कँटीनमध्ये ‘पडीक’ राहणाऱ्यांची नजर खिशाला परवडेल आणि पोटही भरेल असा पदार्थ धुंडाळू लागली..
मॅगी नूडल्सच्या विक्रीवर बंदी आल्यानंतर शाळेतून आल्यावर ‘भूक- भूक’ करणाऱ्या बच्चेकंपनीपासून दिवसभर महाविद्यालयात राहावे लागणाऱ्यांपर्यंत सर्वाचीच पंचाईत झाली. मॅगी प्रकरणानंतर तिची जागा इतर ब्रँडच्या नूडल्सनी घेतली खरी, पण बाजारातल्या नूडल्सच्या एकूण खपावर या प्रकारामुळे परिणाम झाला. हा खप तब्बल ६० ते ७५ टक्क्य़ांनी घटला आणि त्याबरोबर दुसरीकडे मधल्या वेळच्या खाण्याची चिंता मात्र वाढली.
काही घरातल्या आई लोकांशी चर्चा केली असता या ‘तुटवडय़ा’वर त्या आपापल्या पद्धतीने उपाय शोधत असल्याचे दिसून आले. तेजस्विनी चव्हाण म्हणाल्या, ‘मी नोकरी करत असल्यामुळे संध्याकाळी आल्यावर मुलांना खायला काय द्यायचे हा मोठाच प्रश्न असतो. शाळेतून आल्यामुळे मुलांची खाण्यासाठी फार वेळ थांबायची तयारी नसते, आणि दिवसभर काम करून आल्यावर खूप वेळ खपून पदार्थ बनवणे रोज शक्य होत नाही. मुलांना नूडल्स किंवा चायनीज देण्याची आता भीती वाटते. त्यामुळे आता माळ्यावरची सगळी ‘रेसिपी बुक्स’ खाली काढली आहेत. रोज तोच-तो पणा टाळून काय करता येईल हे शोधतो आहोत.’ आहारतज्ज्ञ स्नेहा रममकट्टी म्हणाल्या, ‘नूडल्सबद्दल अजून लोकांच्या मनात शंका दिसत असली तरी पास्ता वगैरे प्रकारांनी नूडल्सची जागा घेण्यास सुरुवात केल्याचे दिसते. मोड आलेल्या कडधान्यांचे चाट, कडधान्ये आणि भाज्या घातलेला खाकरा असे काही प्रकार झटपट करता येण्याजोगे आहेत.’
कॉलेज कट्टय़ांवर मात्र ‘मॅगी नसली म्हणून काय झाले, बाकीच्या नूडल्स आहेत ना’ असेच चित्र आहे. पिवळ्या पाकिटांची जागा ‘यिप्पी’ किंवा ‘टॉप रॅमन’ किंवा ‘सूपी नूडल्स’ने घेतली आहे. पाकीटबंद पदार्थाचा धसका घेतलेले काही विद्यार्थी नूडल्सना पर्याय शोधत आहेत. पण नूडल्स खिशाला परवडतात आणि मित्रांबरोबर ‘शेअर’पण करता येतात, हा त्यांचा प्रश्न काही सुटलेला नाही. बीएमसीसी महाविद्यालयाची विद्यार्थिनी मुक्ता आठवले म्हणाली, ‘सगळेच इन्स्टंट पदार्थ आता नको वाटतात. आता मी कँटीनमध्ये दक्षिण भारतीय पदार्थ घेते. पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने रोज-रोज ते महाग वाटतात. तरीही इडली- सांबार हा पर्याय चांगला वाटतो. आता इतरही नूडल्स कँटीनमध्ये दिसत आहेत, पण वर्षांनुवर्षे खाल्लेली ‘ती’ खास चव बरेच जण ‘मिस’ करतात. चायनीज भेळ आणि इतर जंक फूड कट्टय़ांवर मिळत आहेतच.’
मॉडर्न महाविद्यालयाची राजश्री जख्खेकर म्हणाली, ‘इतर ब्रँडच्या नूडल्सपण शिजवून वीस रुपयांत मिळतात. त्यामुळे अजूनही नूडल्स खिशाला परवडत आहेत, शिवाय त्या दोघांत ‘शेअर’ करता येतात. वडापाव, पावपॅटिस या गोष्टी कँटीन्समध्ये नेहमीच मिळतात. पण ते रोज खायला नको वाटतात.’ कित्येक वसतिगृहांवर अन्न शिजवण्यास बंदी असते, पण जिथे ते चालते तिथे आतापर्यंत बनवला जाणारा ‘मॅगी’ हा लोकप्रिय पदार्थ होता. फग्र्युसनची भक्ती तांबे म्हणाली, ‘हॉस्टेलवर अक्षरश: किटलीत बनवता येईल असा तो पदार्थ होता. बऱ्याच जणांनी इतर ब्रँडच्या नूडल्स, इनस्टिंट पास्ता आणि सूपी नूडल्सना प्राधान्य दिलेले दिसते.’
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा