पुण्याला यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात फार मोठे स्थान मिळाले नसले, तरी नागपूर-पुणे साप्ताहिक व निजामुद्दिन (दिल्ली)-पुणे साप्ताहिक या दोन वातानुकूलित एक्सप्रेस गाडय़ांमुळे रेल्वे प्रवाशांची थोडय़ा प्रमाणात सोय होणार आहे. त्याचबरोबर कर्जत-लोणावळा या चौथ्या लाइनचे सर्वेक्षणही केले जाणार आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तरी फारसे काहीच वरकरणी पदरात पडल्याचे दिसत नसले, तरी रेल्वे स्टेशनवरील स्वच्छता, रेल्वे प्रवाशांच्या निवासाची सोय, आरओचे पिण्याचे स्वच्छ पाणी, ऑफिस ऑन व्हील्स योजनांमुळे एकीकडे प्रवाशांना सुविधा मिळणार आहेत तसेच रेल्वेचे उत्पन्नही वाढणार आहे.
फेब्रुवारी २०१४ मध्ये अंतरिम रेल्वे अर्थसंकल्पात पुण्याला तीन नवीन गाडय़ा मिळाल्या होत्या. त्यात हावडा एसी व पुण्यातून जाणाऱ्या इतर दोन गाडय़ांचा समावेश होता. पुणे शहराला प्रत्येक रेल्वे अर्थसंकल्पात गाडय़ा मिळाल्या आहेत. परंतु, प्रवाशांची वाढलेली संख्या, पुणे विभागातून मिळणारे उत्पन्न आणि पुण्याचे असलेले मध्यवर्ती स्थान यामुळे पुण्याच्या या अर्थसंकल्पाकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. त्या तुलनेत पुण्यासाठी आताच्या रेल्वे अर्थसंकल्पाने विशेष काही दिले नाही. रेल्वे प्रवासी व वाहतुकीवरील ताण वाढत असला तरी पायाभूत सुविधा मात्र तेवढय़ाच राहिल्या, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी अनेक उपाययोजना यंदाच्या अर्थसंकल्पात केल्या असून त्या जर व्यवस्थित राबवल्या, तर नक्कीच प्रवाशांचा ताण दूर होऊ शकतो.
नागपूर-पुणे अंतर जास्त असल्याने आता वातानुकूलित गाडीमुळे नागपूरकर व पुणेकर यांची सोय झाली आहे. निजामुद्दिन-पुणे या साप्ताहिक एसी गाडीमुळे दिल्लीला जाणाऱ्यांना एसीतून जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे. पुण्यात रेल्वेमार्गाच्या आसपास फार मोठी जमीन उपलब्ध नसल्याने आणखी विस्ताराला वाव नाही. फक्त पायाभूत सुविधा सुधारल्या गेल्या, तरी अनेक अडचणी दूर होणार आहेत. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी प्रवाशांना सुविधा देतानाच अर्थसंकल्पापूर्वीच १४.२ टक्के भाडेवाढ केल्याने महसुलाचा प्रश्नही थोडाफार सोडवला आहे. पर्यटनासाठी खास रेल्वेगाडय़ांची सुविधा, ऑफिस ऑन व्हील या योजनांमधूनही महसूल उपलब्ध होऊ शकतो. एकूणच काहीतरी नव्या कल्पना यात मांडल्या आहेत, शिवाय सरकारी-खासगी भागीदारीचा प्रयोग होतो आहे हे स्वागतार्हच आहे.
काय हवे होते?
पुण्यासाठी यापूर्वी मिळालेल्या आश्वासनांनुसार,
– पुणे-मुंबई बुलेट ट्रेन होणे अपेक्षित होते. मात्र, या वेळी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रस्तावित करून पुण्याला बाजूला सारले आहे.
– जागतिक दर्जाचे स्टेशन म्हणून पुणे रेल्वे स्थानकासाठी सुविधा देणे अपेक्षित होते. मात्र, तसे काहीही झालेले नाही.
– पुणे डिव्हिजनचे पुणे झोनमध्ये (अधिक मोठे क्षेत्र) रूपांतर होणे अपेक्षित होते. ते पुण्यात मेट्रो, मोनोरेल आणण्यासाठी उपयुक्त ठरले असते. मात्र, तसे झालेले नाही.
– हर्षां शहा (अध्यक्ष, पुणे रेल्वे प्रवासी संघ)
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा