खंडाळा येथे परीक्षेसाठी दुचाकीवरून निघालेल्या दोन विद्यार्थ्यांचा एसटी बसच्या धडकेत मृत्यू झाला. पुणे-मुंबई महामार्गावर लोणावळ्याजवळील वळवण येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
देवव्रत कलार (वय २२, रा. बोरिवली, मुंबई) आणि रौनक नांबियार (रा. येरवडा, पुणे) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघेही कोहिनूर इन्स्टिटय़ूटचे बीबीएचे विद्यार्थी होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात दोघेही नोकरी करून शिकत होते. बीबीएचे ते विद्यार्थी असून त्यांची एका विषयाची परीक्षा द्यायची राहिली होती. म्हणून दोघेही पुण्याहून दुचाकीवरून खंडाळ्याला निघाले होते. लोणावळ्याजवळील वळवण येथे एका वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जात असताना समोरून आलेल्या एसटीबसला त्यांची जोराची धडक बसली. दोन्ही वाहने वेगात असल्यामुळे त्यांची जोरदार धडक बसली. यामध्ये दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघातातील बस ही ठाणे आगाराची असून ती ठाण्यावरून लोणीला जात होती. या अपघातानंतर महामार्गावर काही वेळ वाहतूककोंडी झाली होती. महामार्ग पोलिसांनी एका बाजूने वाहतूक सुरू ठेवून वाहतूक कोंडी दूर केली. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.